गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षण, धनगर आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवरून वाद सुरू आहे. हा वाद जसा रस्त्यावरच्या आंदोलनामध्ये दिसतो, तसाच तो राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्येही दिसतो. एवढंच नाही, तर हा वाद थेट राज्याच्या उच्च न्यायालयासोबतच देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. मात्र, तरीदेखील राज्यातील जातीपातींचं राजकारण, त्यांचं आरक्षण आणि हेवेदावे कमी झाल्याचं दिसत नाहीये. या पार्श्वभूमीवर जी जात नाही ती जातच हे महाराष्ट्रात एकीकडे स्पष्ट होत असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणावरून थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर अर्थात अप्रत्यक्षपणे थेट शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला आहे.

“हा नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झालाय”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एबीपी माझाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ही भूमिका मांडली आहे. राज्यातील जातीपातीच्या राजकारणाविषयी बोलत असताना त्यांनी याला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. “राज्यात जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झालाय. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला”, असं राज ठाकरे म्हणाले.

raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
Chandrashekhar Bawankule,
“अपघाताच्या घटनेवरून राजकारण करणे चुकीचे”, बावनकुळेंनी काँग्रेसचे आरोप फेटाळले; म्हणाले, “महाराष्ट्रात घातपात…”
Shivsena, NCP, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची फरफट, नाराजीची पटोलेंकडून कबुली
NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?

“कोण आहे हा जेम्स लेन? त्याने पुस्तक लिहिलं. तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता का? तो आता कोण आहे? कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणातून हे सगळं डिझाईन झालं आहे. त्यातून शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा सांगितला गेला, ते करणारे अमुक जातीचे लोक आहेत वगैरे बोललं गेलं”, असंही राज ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.

“ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला, त्याला जाती-पातींमध्ये खितपत ठेवायचं का आपण? पूर्वी फक्त नावं विचारल्यानंतर तुम्ही कुणापैकी असं विचारायचे. म्हणजे तुझी जात कोणती? पण हे फक्त तिथपर्यंतच होतं. पण आता अगदी शाळेपर्यंत हे उतरलंय.”, असं देखील राज ठाकरे म्हणाले.

“देशातलं आत्तापर्यंतचं सर्वोत्कृष्ट मंत्रिमंडळ कुठलं असेल तर ते…”, राज ठाकरेंनी मांडली भूमिका!

“…आपण यूपी-बिहारच्या पातळीवर जातोय”

“काही जणांच्या स्वार्थासाठी लोकांमध्ये द्वेष निर्माण करायचा आणि त्यातून तुमचं राजकीय हित मिळवून घ्यायचं, मग आपण यूपी-बिहारच्या पातळीला चाललोय. जे हे करतायत, ते क्षणिक आहेत. पण त्याचा होणारा परिणाम भयंकर आहे. आत्तापासून आपण आपल्या मुला-मुलींना सांगायला हवं की हे तुमच्याशी फक्त खेळतायत, यांना तुमच्यात इंटरेस्ट नाहीये”, असं देखील राज ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.

“मराठा आरक्षणाचा शेवटी खेळच झाला. मी आधीच सांगितलं होतं की हे होणार नाही. सगळ्यांनाच जर मान्य आहे, तर प्रॉब्लेम कोण करतंय. आपल्या देशात प्रश्न सुटणं ही समस्या समजतात. तो रेंगाळत राहाणं यावर अनेक जणांची घरं भरत असतात. जोपर्यंत महाराष्ट्रातलं जातीचं राजकारण संपत नाही तोपर्यंत या गोष्टी सुटणार नाहीत”, अशी भूमिका राज ठाकरेंनी यावेळी मांडली.