पूरग्रस्तांना तातडीने पुरेशी मदत देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारपासून कोल्हापूरमध्ये पंचगंगा परिक्रमा यात्रेला सुरुवात केली आहे. तसेच, ही नृसिंहवाडी येथे पोहोचल्यानंतर जलसमाधी आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. त्यानुसार आज ही पदयात्रा नृसिंहवाडीत दाखल झाली आहे. यावेळी स्वाभिनामानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदी पात्रात उड्या देखील मारल्या, त्यांना पोलीस प्रशासनाने बोटींच्या सहायाने तातडीने बाहेर काढले.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन देखील केलं आहे. तर, या पदयात्रेत करोना नियमांचा पुर्णपणे फज्जा उडाल्याचेही दिसून आले आहे. या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडीत मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. नृसिंहवाडी -कुरुंदवाड कृष्णा पुलावर मोठ्याप्रमाणावर गर्दी झाली होती.

”कार्यकर्त्यांनी असं काही करू नये, संयम बाळगावा. ज्यावेळी जीव धोक्यात घालायचा असेल त्यावेळी पहिला नंबर माझा असेल. माझ्या अगोदर कुणीही गडबड करू नये. पोलीस प्रशासनाने आम्हाल नृसिंहवाडी एसटी स्टॅण्डवर एकत्र येण्यास परवानगी दिलेली आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर शासनाचा काही प्रस्ताव येणार आहे, तो प्रस्ताव काय आहे ते पाहून आम्ही पुढचा विचार करू. उपजिल्हाधिकारी मला भेटायला येणार आहेत. ते काय प्रस्ताव आणणार आहेत ते पाहून आम्ही ठरवणार आहोत.” असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.