मंगळवारपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरु असणारा राणे विरुद्ध शिवसेना हा वाद आजही शाब्दिक स्वरुपामध्ये सुरु आहे. दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप होत असतानाच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी ट्विटरवरुन शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. सोमवारी राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर मंगळवारी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या. मुंबईतील जुहूमध्ये राणेंच्या घरासमोर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी त्याच दिवशी सायंकाळी युवासेनेच्या नेत्यांची वर्षा या सरकारी बंगल्यावर भेट घेतली. आता याच मुद्द्यावरुन बुधवारी नारायण राणेंनी टोला लगावलेला असताना निलेश राणेंनेही उद्धव ठाकरेंवर टीका केलीय.

नक्की वाचा >> “एखाद्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानखाली मारेन असं म्हटलं तर..”; संजय राऊत संतापले

जुहू येथील राणेंच्या बंगल्याबाहेर निदर्शने करणारे युवासेनेचे कार्यकर्ते आणि राणेंचे समर्थक यांच्यात हाणामारी सुरू झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तसेच या ठिकाणी शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर दोन्हीकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. दरम्यान या सर्व गोंधळामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाल्याचा दावा केला जात आहे. बुधवारी नारायण राणेंनीही पत्रकार परिषदेमध्ये मार खाऊन १२ जण हॉस्पिटला आहेत असा टोला शिवसेनेच्या या आंदोलनासंदर्भात बोलताना लगावला.

नक्की वाचा >> रश्मी ठाकरेंविरोधात भाजपाची पोलिसांत तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी

पत्रकारांनी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तुमच्या घराखाली आंदोलन करणाऱ्यांचे कौतुक केले त्यावर काय सांगाल असा प्रश्न विचारला होता. त्यावर “ते जरा माननीय शरद पवारांना सांगा ना कोणाची पाठ थोपटावी? काय सीमेवरुन पराक्रम करुन आले का? मार खाऊन आले. १२ जण हॉस्पिटलला आहेत. त्यांनी हे सांगितलं असेल तुम्ही मार खाऊन आलात ना, हॉस्पिटला अ‍ॅडमिट आहात ना तर तुमचा सत्कार,”असा टोला नारायण राणेंनी लगावला. आता याच मुद्द्यावरुन निलेश राणेंनी एक फोटो ट्विट केला असून मुख्यंमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

नक्की पाहा >> Video : मुख्यमंत्र्यांसारखीच चूक नितीन गडकरींनीही केली होती?

‘शिवसैनिकांना पडलेला प्रश्न’ असा या फोटोचा मथळा असून खाली दोन फोटो देण्यात आलेत. यापैकी पहिला फोटो हा उद्धव ठाकरेंनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यावेळेचा आहे. या फोटोवर, “युवा सेना कार्यकारिणीमधील आंदोलनावेळी लपलेल्या बड्या बापांच्या आणि आमदारांच्या पोरांना भेटायला उद्धव ठाकरेंना वेळ आहे,” असं लिहिण्यात आलं आहे. तर खाली कथित स्वरुपामधील जखमी कार्यकर्त्यांचे फोटो आहेत. या फोटोवर, “पण राणेंच्या बंगल्याखाली मारहाण झाल्याने हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या जखमी १६ शिवसैनिकांना भेटायला वेळ नाही,” असा मजकूर आहे.

नक्की वाचा >> “फडणवीस व त्यांच्या पक्षाने गांजाच्या शेतात बागडायचे ठरवलेच असेल तर…”; शिवसेनेनं साधला निशाणा

हा फोटो शेअर करताना निलेश राणेंनी, “जे छगन पोलिसांच्या आणि गर्दीच्या मागे उभे राहून तमाशा बघत होते त्यांना पक्षप्रमुख भेटले पण ज्यांना महाप्रसाद भेटला त्यांची साधी विचारपूस करायला पण पक्षप्रमुखाला वेळ नाही,” अशा कॅप्शनसहीत शेअर केलाय.

दरम्यान, राणे आणि शिवसेना दोन्हीकडून सलग तिसऱ्या दिवशीही आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरु असल्याचं चित्र दिसत आहे.