भाजप-शिवसेनेची युती तुटल्यानंतर सरकार चालविण्यासाठी हे दोन पक्ष एकत्र आले आहेत. महापालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीने लढवाव्यात, अशी आमची भूमिका आहे. पण योग्य जागावाटप झाले, तरच युती होईल, अन्यथा आम्ही स्वबळावर लढू, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे केले. दरम्यान, आपण सरकारकडे सुरक्षा मागितली नव्हती, पण सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने ती दिली अशावी, असे दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपने स्वबळावर विजय मिळविण्याचे आवाहन केले आहे. या पाश्र्वभूमीवर आगामी मुंबई व अन्य महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेशी युती करणार का, असे विचारता दानवे म्हणाले, युतीने या निवडणुका लढवाव्यात, असे भाजपला वाटते. पण जागावाटपाचे अधिकार आम्ही स्थानिक पातळीवर दिले आहेत. त्यांचे समाधान होईल, असे जागावाटप शिवसेनेने केले, तर युती राहील, अन्यथा स्वबळावर लढावे लागेल, असे दानवे यांनी सांगितले.
दानवे यांना सरकारने पुरविलेल्या सुरक्षा व्यवस्थेविषयी विचारता ते म्हणाले, मी सरकारकडे सुरक्षा व्यवस्था मागितलेली नाही किंवा सरकारनेही पोलिसांना त्यासाठी सूचना केलेली नाही. यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली गृह विभागाची समिती असून या समितीने सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची शिफारस केली आहे. कोणाच्याही जीविताला किती धोका आहे, हे पाहून ही समिती कोणत्या दर्जाची सुरक्षा पुरवायची, याचा निर्णय घेते. आमची सत्ता नसल्याने याआधीच्या प्रदेशाध्यक्षांना सुरक्षेची गरज नव्हती. पण आता भाजपची सत्ता आल्याने ती वाटली असावी, असे मत दानवे यांनी व्यक्त केले.