पत्रकारांचा अंकुश नसेल, तर लोकशाहीची व्यवस्थाच निरंकुश होईल. त्यामुळे राजकारणी व प्रसारमाध्यमांवर मोठी जबाबदारी आहे. पत्रकारितेचा उपयोग समाज परिवर्तनासाठी केला पाहिजे. त्यासाठी चांगल्या पत्रकारांच्या पाठीशी सरकार उभे राहील. पत्रकार संरक्षण कायद्याबाबत मतमतांतरे असली, तरी पत्रकारांना प्रामाणिक काम करता यावे, या साठी संरक्षणाच्या कायद्याबरोबरच पत्रकारांना सामाजिक संरक्षण देण्यासाठीही सरकार प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आठवा स. मा. गग्रे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत गुरुवारी प्रदान करण्यात आला. खासदार प्रीतम मुंडे व रजनी पाटील, आमदार विनायक मेटे, आर. टी. देशमुख, लक्ष्मण पवार, संगीता ठोंबरे व भीमराव धोंडे, जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, मंत्रालय पत्रकार संघाचे अध्यक्ष चंदन शिरवाळे, पत्रकार संघाचे संस्थापक संतोष मानूरकर आदी उपस्थित होते.
जिल्हा पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमास गोपीनाथ मुंडे यांची उणीव भासत आहे. भाजपला सत्तेच्या सिंहासनापर्यंत नेण्याचे काम मुंडे यांनी केले. स. मा. गग्रे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार आतापर्यंत प्रथितयश पत्रकारांना देण्यात आल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे. लोकशाही समाजव्यवस्थेत प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असते. लोकशाहीतील चौथ्या खांबाचा अंकुश नसेल, तर लोकशाही व्यवस्थाच निरंकुश होईल. मात्र, अलीकडे काही राजकारणी व पत्रकारांना आपल्यापुढे जग छोटं वाटत असल्याने मनासारखे काही घडले नाही की ते राग व्यक्त करतात. पत्रकारांनी सत्ताधाऱ्यांशी एका मर्यादेपलीकडे मत्री करू नये. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवलाच पाहिजे. हे करताना सरकारच्या चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यातही सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. तसे झाले तरच अपेक्षित परिवर्तन होईल.
राजीव खांडेकर विवेकाने पत्रकारिता करतात. आपले विचार परखड व संयमाने मांडतात, असे कौतुक करताना दूरचित्रवाहिन्यांचा कमी काळात वेगाने विकास झाल्याने फारशी प्रगल्भता दिसत नसल्याची खंत फडणवीस यांनी व्यक्त केली. खांडेकर यांनी गर्गे यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार आपणास बळ देणारा आहे. महाराष्ट्रात नाटय़सृष्टीत विष्णुदास भावे पुरस्काराला आहे, तेच महत्व पत्रकारितेत या पुरस्काराला आहे, असे ते म्हणाले. आज समाजात दोन वेगळी टोके दिसतात. एकीकडे दुष्काळाची दाहकता असून मराठवाडय़ाचे वाळवंट होईल, अशी स्थिती आहे. मात्र, या वास्तवाकडे पाठ फिरवली जात आहे. हे वास्तव प्रखरपणे मांडण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे, असे ते म्हणाले. मंगला पठणकर यांच्या नावाने जिल्हा पत्रकार संघाने दहावीतील गुणवंतांसाठी बक्षीस योजना सुरू करावी, अशी सूचना त्यांनी या वेळी केली.
गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी पुरस्कार सुरू करण्याची अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांनी प्रास्ताविक केले. खासदार रजनी पाटील, राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोिवद घोळवे,
स्वागताध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची भाषणे झाली. पत्रकारितेत २५ वष्रे पूर्ण झाल्याबद्दल संतोष मानूरकर, तर पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याबद्दल सुशील कुलकर्णी यांच्यासह विविध पुरस्कारप्राप्त पत्रकारांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मानवी हक्कचे अॅड. एकनाथ आवाड यांच्या स्मृतींनाही उजाळा देण्यात आला. स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी नेपाळच्या भूकंपग्रस्तांसाठी जमा केलेला निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

Story img Loader