मंदिरात जाऊन पाणी पिणाऱ्या एका मुस्लीम मुलाला मारहाण करण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे घडली होती. या घटनेचे देशभरात पडसाद उमटले. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही रोखठोक सदरातून या घटनेवर खंत व्यक्त केली. “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. दलितांना पाणवठ्यावर येण्यास बंदी होती. त्या विरोधात हे बंड होते. पाण्यास जातही असते हे डॉ. आंबेडकरांनी तेव्हा सांगितले. आता पाण्यास धर्मही असल्याचे त्या मुसलमान मुलाने दाखवून दिले,” असं म्हणत यांनी घटनेवर भाष्य केलं आहे.

“जात आणि धर्माचे भूत आपल्या देशातून जाईल असे दिसत नाही. जात आणि धर्म आरक्षण, राखीव जागांच्या पलीकडे जाऊन पोहोचला आहे. आपला हिंदुस्थान देश महान असल्याचे भाषणात नेहमीच सांगितले जाते. पण त्या महानपणास जातीयतेचा डाग लावून काही लोक देशाला खुजे करीत असतात. अशाच एका प्रकरणाने देशाच्या महानतेवर प्रश्नचिन्ह लागले. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे जे घडले ते धक्कादायक आहे. येथील एका मंदिरात तहानलेला एक लहान मुलगा पाणी पिण्यास गेला. नळाच्या तोटीतून तो दोन घोट पाणी प्यायला, तोच मंदिरातील एक-दोन लोक धावत तेथे आले. त्या मुलास त्यांनी निर्घृणपणे मारले. त्या तहानलेल्या लहान मुलास का मारले? तर तो धर्माने मुसलमान होता. त्याचा गुन्हा असा की, तो मुसलमान असूनही तहान भागविण्यासाठी हिंदूंच्या मंदिरात गेला. मंदिराबाहेर एक बोर्ड आधीच लागला होता. मुस्लिमांना आतमध्ये प्रवेश नाही! बस्स. हा जणू देवाचाच आदेश होता की, तहानेने तडफडणाऱ्या मुलांनाही मंदिरात दोन घोट पाण्यासाठी प्रवेश द्यायचा नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. दलितांना पाणवठ्यावर येण्यास बंदी होती. त्या विरोधात हे बंड होते. पाण्यास जातही असते हे डॉ. आंबेडकरांनी तेव्हा सांगितले. आता पाण्यास धर्मही असल्याचे त्या मुसलमान मुलाने दाखवून दिले,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

“कोणत्या हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व आपण करीत आहोत? असा प्रश्न मला या सर्व प्रकरणात पडला. सहिष्णुता हा हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा अलंकार. अशा घटना समोर येतात तेव्हा तो अलंकार खोटा ठरतो. हिंदू समाजातील पददलित, गरीब लोक मोठ्या प्रमाणावर धर्मांतरे करतात. आदिवासी पाड्यांवर ख्रिश्चन मिशनरी जातात व त्या अशिक्षित लोकांचा बुद्धिभेद करतात. अशा वेळी त्या मिशनऱ्यांना ओडिशाच्या जंगलात जाळून मारणारे लोक आपल्याच धर्मात निर्माण झाले व त्या जाळणाऱ्यांचा जाहीर गौरव करणारे लोकही पाहिले. ‘लव्ह जिहाद’विरोधात वातावरण तयार करणे, गोमांसप्रकरणी हिंसाचार घडवणे हे आता रोजचेच झाले आहे. पण हे सर्व करणारे आणि त्या कृत्याचे समर्थन करणारे आता तहानलेल्या मुस्लिम मुलास, तो मंदिरात पाणी प्यायला म्हणून जी मारहाण केली गेली त्या घटनेचेही समर्थन करणार आहेत का?,” असा सवालही राऊत यांनी केला आहे.

“प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी या ‘जय श्रीराम’चा नारा देत नाहीत, त्या हिंदूविरोधी आहेत, असा प्रचार सुरू आहे. पण हिंदूंच्या मंदिरात तहानलेल्यास पाणी नाकारणे व पाणी प्यायल्याबद्दल एका मुलास मारणे हेसुद्धा तितकेच हिंदूविरोधी आहे. पंतप्रधान मोदी हे त्यांच्या ‘मन की बात’मधून देशातील अनेक लहानसहान घटनांना भावनिक फोडणी देत असतात. त्यांनी पाणी नाकारल्या गेलेल्या त्या लहान मुलाच्या विषयासही स्पर्श करावा,” असं आवाहन राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांना केलं आहे.

“मंदिरात मुलास पाणी नाकारले व त्यास मारहाण केली तेव्हा मंदिराचा पुजारी हे सर्व पाहात असेल तर त्यानेही धर्मद्रोहच केला. भर तळपत्या उन्हात कुत्र्यास पाणी पाजणारे, भाकरी खाऊ घालणारे संत हिंदू धर्माचे वैभव आहे. तहानलेल्या मुलास पाणी नाकारणे हा त्या संत परंपरेचाही अपमान आहे. जातीभेद आणि धर्मभेद आपल्या नसानसात आहेच, पण पाण्यासही जातीधर्माची लेबले आम्ही आजही लावत आहोत. मुसलमान मुलास पाणी नाकारले. मंदिरातील लोकांनी त्या मुलास मारले. या बातमीचे पडसाद जगभरातील मीडियात उमटले. ‘पहा, बाजूच्या देशात निरपराध मुसलमानांवर कसे अत्याचार होत आहेत. त्यांना पाणीही नाकारले जाते,’ अशा बातम्या ठळकपणे पाकिस्तान, बांगलादेशच्या वृत्तपत्रांत छापल्या. युरोप, अमेरिकेतील वृत्तपत्रांनी या घटनेची दखल घेतली. हिंदू धर्माच्या सहिष्णुतेवरच या सगळय़ांनी प्रश्नचिन्ह उभे केले. एका बाजूला पंतप्रधान मोदी पाकिस्तानला कोविड लसीचे लाखो मोफत डोस पुरवण्याची मानवता दाखवतात, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेले लोक मुसलमान मुलास मंदिरात पाणी नाकारतात. हे रामराज्य नाही! देशाची संस्कृती तर अजिबात नाही, पण बोलायचे कोणी?,” असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Story img Loader