नारायण राणे आणि त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी नारायण राणे यांना खडे बोल सुनावले. राणेंनी मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीचा अपमान करणं थांबवावं आणि मर्यादेत रहावं असं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे. नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राऊत यांनी, “राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी सत्तेत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना असंसदीय भाषेचा वापर करु नये. उद्या उठून कोणी चुकीच्या भाषेचा वापर करत ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानशीलात वाजवेल’ असं म्हटलं तर ते (केंद्र सरकार) त्या व्यक्तीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतील,” असं मत व्यक्त केलं.

नक्की वाचा >> राणे अटक आणि सुटका प्रकरण : संजय राऊतांची अवघ्या एका शब्दात प्रतिक्रिया

सध्या बंगळुरुच्या शासकीय दौऱ्यावर असणाऱ्या राऊत यांनी “पंतप्रधानांविरोधात बोलणाऱ्यासाठी जो नियम लावला जातो तोच राणेंना लागू होतो ज्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात अशी भाषा वापरली,” असंही म्हटलं आहे. “नियम आणि सन्मानाच्या दृष्टीने विचार केल्यास मुख्यमंत्री पदही पंतप्रधान पदाच्या तुलनेचेच आहे,” असं मत राऊत यांनी व्यक्त केलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जन आशिर्वाद यात्रेदरम्यान मंगळवारी अटक करुन जामीनावर सुटका करण्यात आली. मात्र या प्रकरणामुळे मंगळवारी दिवसभर शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये दिसून आला.

नक्की पाहा >> Video : मुख्यमंत्र्यांसारखीच चूक नितीन गडकरींनीही केली होती?

संजय राऊत यांनी शिवसेना पक्षाच्या नेत्यासंदर्भातील अशी वक्तव्य सहन करणार नसल्याचं सांगितलं. “राणेंनी त्यांच्या चुकांमधून शिकण्याची गरज आहे. एक खासदार आणि केंद्रीय मंत्री असताना त्यांना काय आणि कसं बोललं पाहिजे हे समजायला हवं. शिवसेनेविरोधात लढण्याची हिंमत कोणातही नाही. त्यामुळे ते अशी वादग्रस्त विधाने करतात,” असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. राऊत सध्या ओल्ड एअरपोर्ट रोडवरील लीला पॅलेस हॉटेलमध्ये राहत आहे. कालच त्यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा आणि काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा >> रश्मी ठाकरेंविरोधात भाजपाची पोलिसांत तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी

नक्की वाचा >> “फडणवीस व त्यांच्या पक्षाने गांजाच्या शेतात बागडायचे ठरवलेच असेल तर…”; शिवसेनेनं साधला निशाणा

थेट प्रतिक्रिया नाही पण ट्विटमधून निशाणा

राणेंना अटक झाल्याच्या दिवशी राऊत यांनी थेट कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी ट्विटरवरुन एक फोटो पोस्ट करत या प्रकरणावर भाष्य केलं होतं. या फोटोमध्ये वाघाच्या तोंडामध्ये कोंबडीच्या पिल्लाला दाखवण्यात आलं आहे. फोटोवर ‘आजचा दिवस थोडक्यात’ असं लिहिलेलं आहे. या फोटोमधून राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला. राजकारणामध्ये येण्यापूर्वी राणेंचा कोंबडी विक्रीचा व्यवसाय असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच काल शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनामध्ये अनेक ठिकाणी भाजपाच्या कार्यालयांमध्ये कोंबड्या सोडण्यात आल्या तसेच कोंबडी असा उल्लेख असणारी बॅनरबाजीही करण्यात आली. त्याचसंदर्भाने राऊत यांनी कोंबडीचं पिल्लू वाघाने तोंडात पकडल्याचा फोटो ट्विट केलाय.