“भाजपाची सत्ता आल्यास ओबीसी आरक्षण मिळवून देऊ शकलो नाही, तर संन्यास घेईन”, असं विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. २६ जून रोजी ओबीसी आरक्षणासाठी भाजपानं केलेल्या चक्काजाम आंदोलनादरम्यान ते असं म्हणाले होते. मात्र, यावरून आता राज्यात चांगलाच कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे. सत्ताधाऱ्यांकडून फडणवीसांच्या या विधानावर खोचक टीका केली जात आहे. एकीकडे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांच्या “वेगळा विदर्भा झाला नाही तर लग्न करणार नाही” या विधानाची आठवण करून दिली. तर दुसरीकडे आता संजय राऊतांनी देखील भाजपावर निशाणा साधला आहे.

“विरोधकांनी टांग अडवायची गरज नाही”

सत्ताधाऱ्यांमध्ये सारंकाही आलबेल नसल्याच्या मुद्द्यावरून भाजपाकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जात असताना आता संजय राऊतांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. “विरोधी पक्षांनी आमच्यामध्ये टांग अडवायची गरज नाही. आमचं आम्ही बघू. संजय राऊत काय करतात किंवा करत नाहीत हा आमचा प्रश्न आहे. तीन पक्षांचे नेते प्रत्यक्ष काय करतात हे त्यांना दिसत नसेल, तर तो त्यांचा दृष्टीदोष आहे. मुळात त्यांनी महाविकासआघाडीकडे पाहू देखील नाही. उत्तम काम सुरू आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

..त्यापेक्षा राज्याच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं!

दरम्यान, संजय राऊत वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केल्यासंदर्भात संजय राऊतांनी खोचक टोला लगावला. “अनेक प्रश्नांमध्ये विरोधी पक्षांनी फक्त विरोधासाठी टांग टाकायची गरज नाही. राज्य सुरळीत चालावं ही विरोधी पक्षांची भूमिका असायला हवी. ती आम्हाला दिसत नाही. फडणवीस जेव्हा संन्यास घेण्याची भाषा करतात, तेव्हा ते त्या पक्षाचं वैफल्य आहे. राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी विरोधी पक्षांनी आणि त्यांच्या नेत्याने राज्य सरकारसोबत खांद्याला खांदा लावून काम केलं तर राज्याची जनता त्यांना दुवा देईल”, असं ते म्हणाले.

…तर राजकीय संन्यास! – वाचा सविस्तर

कुणीही नाराज नाही, मतभेद असू शकतो!

महाविकासआघाडी सरकारमध्ये आपापसांत नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू सताना संजय राऊतांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “सरकार एक पक्षाचं असो, दोन पक्षाचं असो, महाविकासआघाडीचं असो किंवा अटलजींसारखं ३२ पक्षांचं असो. मनुष्य म्हटला की कामाच्या पद्धतीवरून लोकांमध्ये मतभेद असू शकतो. याचा अर्थ कुणी नाराज आहे असा होत नाही. कॅबिनेटमध्ये एखाद्या विषयावर दुसरं मत असू शकतं. म्हणून ती कॅबिनेटची बैठक बोलावली जाते. त्यातून निर्णय घेतला जातो. हा जो बाहेर धूर सोडला जातोय नाराजीचा, त्यात अर्थ नाही. हे धुकं आहे. ते आता खाली बसलं आहे”, असं ते म्हणाले.

“फडणवीस म्हणाले होते, स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही; त्याचं काय झालं?”

“विरोधी पक्षांना हवं तसं घडत नाहीये”

“सरकारमध्ये नाराज कुणीच नाही. विरोधी पक्षाला हवं आहे तसं काही घडत नाही. त्यामुळे त्यांचा नाराज शब्दावर जास्त जोर आहे. त्यामुळे सगळा आनंदच आहे. करोनाचं संकट नसतं तर मुख्यमंत्र्यांनी योजलेल्या अनेक योजना पुढे नेता आल्या असत्या. पण आता हळूहळू कामाला आणि सरकारला गती मिळते आहे. मी ठामपणे सांगू शकतो की सध्याचं सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालीच हे सरकार चालेल”, असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.