रवींद्र जुनारकर

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर कोरची, कुरखेडा तालुक्यातील १९ ग्रामसभांचे बँकेने सील केलेले खाते तात्काळ सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांना दिले आहेत.

कोरची व कुरखेडा तालुक्यातील १९ ग्रामसभांच्या बँक खात्यात मोबाईल टॉवरचे ७० ते ७५ लाख रूपये जमा झालेले आहेत. यातील काही पैसा खर्च झाला आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी या ग्रामसभांची पाच सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू केली. यातील दोन ग्रामपंचायतींमध्ये घोळ झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी तात्काळ पूर्ण करून सील केलेले बँक खाते तात्काळ सुरू करावे असे निर्देश यावेळी वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तेंदूपत्त्याचा हंगाम असल्यामुळे या संदर्भात तातडीने कारवाई करावी असेही सांगितले. काही ग्रामसभांचा घोळ आहे. ग्रामसेवकाला परस्पर काढून स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश केला गेला आहे. असे असले तरी ग्रामसभांना तेंदूपत्त्याचे काम करू द्यावे, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट सांगितले.

Story img Loader