रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते, बिहार आणि केरळचे माजी राज्यपाल, माजी खासदार आणि दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष रा.सू. उपाख्य रामकृष्ण सूर्यभान गवई यांचे येथील खाजगी रुग्णालयात शनिवारी निधन झाले. ते ८६ वर्षांंचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी कमलताई, दोन मुलगे- उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई, रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे प्रमुख डॉ. राजेंद्र, मुलगी कीर्ती असा परिवार आहे. रविवारी दुपारी ३ वाजता अमरावती जिल्ह्य़ातील त्यांच्या जन्मगावी दारापूर येथे शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात येतील.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे गवई यांना धंतोलीमधील श्रीकृष्ण रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असताना दुपारी १.५० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गवई यांच्या निधनामुळे महाराष्ट्राची आणि देशाचीही अपरिमित हानी झाली आहे. समाजातील वंचितांच्या उत्कर्षांसाठी त्यांनी केलेले कार्य आम्हाला प्रेरणादायी आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
ल्ल ल्ल ल्ल
पुरोगामी विचारांचे नेतृत्व हरपले आहे. महाराष्ट्र एका कुशल संघटकास, अभ्यासू व पुरोगामी नेतृत्वास मुकला असून पुरोगामी चळवळीचे व उपेक्षितांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.
– शरद पवार,
अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस<br />मुरब्बी राजकारणी

मुरब्बी राजकारणी म्हणून रा.सू.गवई यांची ख्याती होती. १९६८ ते ७८ विधान परिषदेचे उपाध्यक्ष आणि १९७८ ते ८२ विधान परिषदेचे अध्यक्षपद त्यांना बहाल करण्यात आले. त्यानंतर १२ डिसेंबर १९८६ ते १९८८ काळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आले. १९९८-९९ लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले एप्रिल २००० मध्ये राज्यसभेवर निवडून आले. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे ते अध्यक्ष होते.
विधान परिषदेचे ते सलग ३० वर्षे सभासद होते. राज्यात रोजगार हमी योजना सुरू व्हावी, यासाठी त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विधान परिषदेचे तत्कालिन अध्यक्ष वि.स. पागे यांच्या सहकार्याने पायाभूत काम केले. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सेंट्रल जनरल कौन्सिल ऑफ जागतिक बौद्ध फेलोशिपच्या सभेत एकमताने निवड करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी आणि अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष होते.

Story img Loader