गतवर्षी प्रत्यक्ष शाळा भरू न शकल्याने झालेले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने लागू केलेला सेतू अभ्यासक्रम त्यातील नियोजनशून्यतेमुळे विद्यार्थी-पालकांसाठी त्रासदायक ठरत आहे. सेतू पूर्ण करून घ्यायचा की यावर्षीचा अभ्यासक्रम शिकवायचा या संभ्रमात असलेल्या शाळांनी सेतूची जबाबदारी पालकांवर सोपवली आहे. नियमित अभ्यास, सेतू, स्पर्धा परीक्षांची तयारी यांमुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा अतिरिक्त ताण येत आहे.
काय आहे ‘सेतू’ अभ्यासक्रम?
प्रत्यक्ष अध्यापनाअभावी मागील इयत्तेतील क्षमता संपादित न होताच विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षामध्ये प्रविष्ट झाल्याची शक्यता गृहीत धरून ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे’ने (एससीईआरटी) इयत्ता दुसरी ते दहावीसाठी सेतू अभ्यासक्रम तयार केला. १ जुलै ते १४ ऑगस्ट दरम्यान रोज सर्व विषयांच्या कृतिपत्रिका विद्यार्थ्यांनी लेखी सोडवणे अपेक्षित असून त्यावर आधारित ३ चाचणी परीक्षाही नियोजित आहेत. यातील हेतू चांगला असल्याचे शिक्षक, पालकांना मान्य असले तरीही अंमलबजावणीतील नियोजनशून्यतेबाबत नाराजी आहे.
चालू इयत्तेचा अभ्यास शिकवण्यासाठीच ऑनलाइन तासिका अपुऱ्या असल्याने कृतिपत्रिकांची जबाबदारी अनेक शाळांनी विद्यार्थ्यांवर पर्यायाने पालकांवर सोपवली आहे. ऑनलाइन तासिका, इतर स्पर्धा परीक्षांची तयारी, कला विषयांचे ऑनलाइन प्रशिक्षण आणि ऑनलाइन शिक्षणामुळे सुटलेला लेखन सराव यांत सेतूची भर पडल्याने विद्यार्थ्यांची दमछाक होते आहे. सेतूचे गुण अंतिम निकालात ग्राह्य धरले जाणार का याबाबतही स्पष्टता नसल्याचं दिसून येत आहे.
“…तर सेतू अभ्यासक्रमाची गरज पडली नसती!”
सुरूवातीचे ४५ दिवस सेतू अभ्यासक्रम राबवल्यास यावर्षीचा अभ्यासक्रम शिकवून त्यावर पहिली चाचणी कधी घ्यावी? असा प्रश्न शाळांसमोर आहे. ‘गतवर्षी विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याची सूचना शिक्षण विभागाने दिली होती. त्याच वेळी परीक्षा झाली असती तर विद्यार्थी कशात मागे आहेत याची कल्पना आली असती व स्वतंत्र सेतू अभ्यासक्रमाची गरज भासली नसती’, असे मत ‘मुंबई मुख्याध्यापक संघटने’चे सचिव पांडुरंग केंगार यांनी व्यक्त केले.
‘प्राथमिक वर्गांना गेल्या वर्षी लेखन कमी होते. यावर्षी अचानक लेखनाचा एवढा भार विद्यार्थ्यांवर टाकणे योग्य नाही. हा अभ्यासक्रम उन्हाळी सुट्टीच्या शेवटी द्यायला हवा होता किंवा शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर तोंडी स्वरूपात असायला हवा’, असे पालक स्वाती दामले यांचे म्हणणे आहे. ‘पीडीएफ बघण्यास मर्यादा येत असल्याने ५०० रुपये खर्चून सेतूचे पुस्तक खरेदी करावे लागले. यापेक्षा विद्यार्थ्यांना ज्या घटकांबाबत शंका असेल त्याचीच उजळणी व्हावी’, अशी अपेक्षा पालक श्याम परब यांनी व्यक्त केली.
दररोज ऑनलाइन तासिका अशक्य
दरदिवशीच्या कृतींची संख्या कमी करावी व अधिकाधिक उजळणी तोंडी स्वरूपात व्हावी, असे पत्र ‘पुरोगामी शिक्षक संघटने’ने शिक्षण विभागाला लिहिले होते. ‘प्रत्यक्ष शाळा सुरू असताना एकाच दिवशी सर्व विषयांचा अभ्यास विद्यार्थ्यांना दिला जात नाही. शिवाय दरदिवशी सर्व विषयांच्या कृतिपत्रिकांसाठी ऑनलाइन तासिका आयोजित करणे शक्य नाही’, असे संघटनेचे तानाजी कांबळे यांनी सांगितले.
मराठी, उर्दू माध्यमच का?
सेतू अभ्यासक्रम मराठी, उर्दू माध्यमांसाठीच आहे. सेमी इंग्रजीसाठीचा अभ्यासक्रमही १५ दिवस उशिरा आला. ‘फक्त मराठी माध्यमाचेच विद्याार्थी मागे पडतात असे गृहीत धरून त्यांनाच सेतू लागू करणे योग्य नाही. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनाही याची गरज असू शकते’, असे बालमोहन विद्यामंदिरच्या पर्यवेक्षिका शुभदा निगुडकर म्हणाल्या. इतर माध्यमांनीही सेतूच्या धरतीवर अभ्यासक्रम राबवणे अपेक्षित असल्याचे एससीईआरटीतर्फे सांगण्यात येत असले तरीही सेतूबाबतच्या परिपत्रकात तशी तरतूद नाही.
गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमातील काही क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाल्या नसतील तर त्यांची उजळणी सेतूमध्ये होत असल्याने त्याच्या मूल्यमापनाचे गुण कुठे गृहीत धरले जाणार आहेत याचा विचार शिक्षक-पालकांनी करू नये. हा अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेण्याची प्राथमिक जबाबदारी शाळांची आहे. गतवर्षीच्या क्षमता विद्यार्थ्यांना प्राप्त झाल्याशिवाय पुढील इयत्तेच्या अभ्यासक्रमाची घटक चाचणी न घेणे अपेक्षित आहे, असे एससीईआरटीचे उपसंचालक विकास गरड यांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांमध्ये गतवर्षीच्या सर्व क्षमता विकसित झाल्या आहेत त्यांना सेतू अभ्यासक्रमाची सक्ती करू नये, असेही मत त्यांनी व्यक्त केले; मात्र तशी सूचना सेतूबाबतच्या परिपत्रकात नाही.