पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून विरोधकांच्या निशाण्यावर असणारे संजय राठोड यांनी अखेर मौन सोडलं आहे. संजय राठोड पोहरादेवीत दर्शनासाठी पोहोचले होते, यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. गेल्या ३० वर्षांपासून माझ्या सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा प्रकार सुरु असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

“पुण्यात तरुणीचा जो दुर्दैवी मृत्यू झाला त्याबद्दल संपूर्ण बंजारा समाजाला दु:ख झालं असून आम्ही सर्व त्यात सहभागी होतं. पण ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण केलं जात आहे ते दुर्दैवी आहे. मी मागासवर्गीय कुटुंबातून असून ओबीसीचं नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. गेल्या ३० वर्षांपासून माझ्या सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा वाईट प्रकार सर्वांनी पाहिला आहे,” असं ते म्हणाले.

“कोण आला रे कोण आला…बंजाऱ्यांचा वाघ आला,” तुफान गर्दीत संजय राठोड यांच्या समर्थकांची घोषणाबाजी

“प्रसारमाध्यमं, समाजमाध्यमं यामधून जे काही दाखवण्याचा प्रकार केला त्यात कोणतंही तथ्य नाही. याची चौकशी मुख्यमंत्र्य्यांनी लावली आहे. त्या माध्यमातून पोलीस तपास करत असून सर्व गोष्टी स्पष्ट होतील. पण गेल्या १० दिवसांपासून समाजमाध्यमं, प्रसारमाध्यमांमधून बदनामी आणि घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. पोलीस चौकशी करत असून माझं कुटुंब आणि समाजाची बदनामी करु नका,” अशी विनंती यावेळी त्यांनी केली.

“मी १४ नाही तर १० दिवस घरी होतो. यावेळी माझ्या कुटुंबाला सांभाळण्याचं काम मी करत होते. मुंबईमधील फ्लॅटमधून शासकीय कामकाजदेखील सुरु होतं. यापुढेही कामकाज सुरु राहील. जे काही सत्य असेल ते चौकशीत बाहेर येईल,” असं संजय राठोड म्हणाले आहेत.

पूजा चव्हाण तीन वर्ष भाजपा कार्यकर्ता होती; वडिलांचा गौप्यस्फोट
“पूजावर खूप ताण होता”; वडिलांनी प्रथमच केला खुलासा

“मी चार वेळा निवडून आलो आहे. माझ्या समाजाचं प्रेम माझ्यावर आहे. अनेक लोक फोटो काढत असतात. मी ३० वर्ष सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता असून सर्वांना सोबत घेऊन काम केलं आहे. एका घटनेमुळे आपण सर्वजण मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करु नका एवढीच विनंती आहे,” असं संजय राठोड यांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण –
मुळची परळीची असणाऱ्या पूजा चव्हाणे पुण्यात ७ फेब्रुवारीला मध्यरात्री आत्महत्या केली. पूजा चव्हाण शिक्षणासाठी आपल्या भावासोबत पुण्यातल्या हडपसर भागात राहत होती. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आसपास तिनं महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच या तरुणीनं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जाऊ लागलं.

या घटनेमागे महाआघाडी सरकारमधील एक मंत्री असल्याची चर्चा सुरू असताना आता त्या तरुणीच्या जवळील एका व्यक्तीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यामध्ये ती व्यक्ती साहेब ती आत्महत्या करणार आहे. तिला समजून सांगा असं सांगत असल्याचं ऐकू येत आहे. पण ती व्यक्ती नेमकी कोणासोबत बोलत आहे हे उघड झालेलं नाही.