पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण तापलं असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. आरोपांवर शिवसेना नेते आणि वनंत्री संजय राठोड यांनी मौन बाळगलं असताना महाविकास आघाडीमधील नेते मात्र त्यांची बाजू मांडताना दिसत होते. मात्र त्यातच १५ दिवसांनी संजय राठोड हे सर्वांसमोर आले असून पोहरादेवीला दाखल झाले आहेत.

पण, शक्तीप्रदर्शन करण्याच्या नादात राज्यावर घोंघावणाऱ्या करोना संकटाचा त्यांच्या समर्थकांना विसर पडल्याचंच दिसलं. इतकंच काय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनालाही संजय राठोड आणि समर्थकांनी हरताळ फासल्याचं पोहरादेवी परिसरातील प्रचंड गर्दी बघून दिसून आलं.विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या समर्थकांकडून शक्तीप्रदर्शन करताना “कोण आला रे कोण आला…बंजाऱ्यांचा वाघ आला” अशा घोषणाही दिल्या जात आहेत.

संजय राठोड अखेर १५ दिवसांनी सर्वांसमोर

पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आल्यापासूनच संजय राठोड अज्ञातवासात गेले होते. एका ऑडिओ क्लिपमुळे संजय राठोड यांचं नाव चर्चेत आलं होतं. यानंतर भाजपाने जाहीरपणे संजय राठोड यांच्याविरोधात कारवाईची मागणी सुरु केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच संजय राठोड सर्वांसमोर आले असून पोहरादेवीत दाखल झाले. यावेळी त्यांनी जगदंबा देवी तसंच सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. मात्र यावेळी त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावर कोणतंही भाष्य केलेलं नसून मौन कायम ठेवलं आहे.

पूजा चव्हाण तीन वर्ष भाजपा कार्यकर्ता होती; वडिलांचा गौप्यस्फोट
“पूजावर खूप ताण होता”; वडिलांनी प्रथमच केला खुलासा

दरम्यान राज्यात करोना रुग्ण वाढत असल्याने एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली असताना दुसरीकडे संजय राठोड यांच्या समर्थकांनी तुफान गर्दी केली आहे. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जदेखील करावा लागला. मात्र गर्दी कमी होत नसून यावेळी संजय राठोड यांना पाठिंबा दाखवण्यासाठी घोषणा दिल्या जात आहेत.

काय आहे प्रकरण –
मुळची परळीची असणाऱ्या पूजा चव्हाणे पुण्यात ७ फेब्रुवारीला मध्यरात्री आत्महत्या केली. पूजा चव्हाण शिक्षणासाठी आपल्या भावासोबत पुण्यातल्या हडपसर भागात राहत होती. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आसपास तिनं महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच या तरुणीनं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जाऊ लागलं.

या घटनेमागे महाआघाडी सरकारमधील एक मंत्री असल्याची चर्चा सुरू असताना आता त्या तरुणीच्या जवळील एका व्यक्तीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यामध्ये ती व्यक्ती साहेब ती आत्महत्या करणार आहे. तिला समजून सांगा असं सांगत असल्याचं ऐकू येत आहे. पण ती व्यक्ती नेमकी कोणासोबत बोलत आहे हे उघड झालेलं नाही.