माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गतवर्षी पहाटे शपथविधी घेत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आणला होता. त्यांच्या पहाटेच्या शपथविधीला आज एक वर्ष पूर्ण झालं असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरुन टोला लगावला आहे. पहाटेनंतर त्यांना धक्के बसले, त्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“ती पहाट नव्हती तो अंधकार होता. आम्हाला कोणताही धक्का बसला नव्हता. आमच्या सर्व स्मृती सुखदायक आहेत. त्या पहाटेच्या सुद्धा…पहाटेनंतर त्यांना धक्के बसले, त्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. पहाटे पहाटे मला जाग आली…अजून ते झोपलेले नाहीत,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. “पुन्हा ती पहाट येणार नाही, कधीच येणार नाही,” असाही विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा- आधी नितीश कुमारांना बिहारमध्ये लव जिहादचा कायदा करू द्या; संजय राऊतांचं भाजपाला आव्हान

संजय राऊत यांनी यावेळी सर्वात आधी बिहारमध्ये लव्ह जिहाद कायदा करावा असं आव्हान दिलं आहे. “गेल्या काही दिवसांपासून देशात आणि महाराष्ट्रात लव्ह जिहाद विषयावर महाराष्ट्रातला विरोधी पक्ष, तसंच देशात जिथे भाजपाची सत्ता नाही तिथे लव्ह जिहादसंबंधी कायदा करा अशी मागणी होत आहे. बहुधा पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी हे होत आहे. मी यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात कायदा होतोय. महाराष्ट्रात करा असा हट्ट केला जात आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचं राहू दे…बिहारमध्ये नितीश कुमार जवळजवळ भाजपाचेच मुख्यमंत्री आहेत. बिहारमध्ये सर्वात आधी कायदा करा.. तिथे नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जो कायदा बनवला जाईल त्याचा अभ्यास करु आणि नंतर महाराष्ट्रात विचार करु. राज्यात लव्ह जिहाद नव्हे तर करोनाटं मोठं संकट आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- शरद पवारांना छोटे नेते म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांनी फटकारलं; म्हणाले…

चंद्रकांत पाटलांच्या शरद पवारांवरील टीकेवर प्रतिक्रिया
संजय राऊत यांनी यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “शरद पवारांना जे छोटे नेते बोलत आहेत त्यांना पवार साहेबांच्या राजकारणाची उंची पाहणं झेपलेलं नाही. इतक्या छोट्या नेत्याला मोदी यांच्या सरकारने भारतरत्न नंतरचा सर्वात मोठा नागरी सन्मान दिला आहे. सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रालीत महान योगदानासाठी हा पुरस्कार दिला आहे. हे चंद्रकांत पाटील यांना माहिती नसावं. माहिती नसेल तर पीएमओकडून माहिती घ्यावी. याच छोट्या नेत्याचा अनेक वर्ष नरेंद्र मोदी सल्ला घेऊन गुजरात आणि देशाचा कारभार करत होते, आजही करत असावेत. बहुदा चंद्रकांत पाटील आणि भाजपामध्ये वैचारिक दरी निर्माण झाली आहे. किंवा मोदी सांगत आहेत तो संदेश यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. किंवा मोदींना हे जुमानत नाही असं दिसत आहे. तुम्ही राजकारण करा पण वैयक्तिक स्तरावर उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याबद्ल इतक्या खालय्चा स्तरावर येऊन बोलू नका”.