‘वन नेशन वन इलेक्शन’च्या मुद्द्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र सामनाला दिलेल्या मुलाखतीतून भाजपावर निशाणा साधला आहे. ज्यांच्या सुपीक डोक्यात ही कल्पना आहे ते सर्वांना एकदा मूर्ख बनवण्याची संधी म्हणून ते ‘वन नेशन’वाले इलेक्शनकडे बघताहेत का? सगळ्यांना एकदा बनवू शकाल. सगळ्यांना परत परत मूर्ख नाही बनवता येत,’ अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी ‘वन नेशन वन इलेक्शन’चा नारा देणाऱ्या पंतप्रधान मोदींवर टीका केली.

‘वन नेशन वन इलेक्शन’ म्हणजे सगळ्या निवडणुका एकदम. आपल्याकडे म्हटलं जातं ना तुम्ही सगळ्यांना एकदा मूर्ख बनवू शकता, एकाला सर्वकाळ मूर्ख बनवू शकता, पण सर्वांना सर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही. तर मग ज्यांच्या सुपीक डोक्यात ही कल्पना आली ते सर्वांना एकदा मूर्ख बनविण्याची संधी म्हणून ते ‘वन नेशन’वाले इलेक्शन बघताहेत का? असा सवाल उद्धव यांनी उपस्थित केला.

‘वन नेशन वन इलेक्शन’ कल्पना चांगली आहे. ठीक आहे, पण सर्वांना एकदा मूर्ख बनवता येतं आणि ती संधी म्हणून कोण याकडे बघत असेल तर ते चूक आहे, असं उद्धव म्हणाले. ‘पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्री हे प्रचारापासून दूर राहिले पाहिजेत. कारण मुख्यमंत्री म्हणून, पंतप्रधान म्हणून, मंत्री म्हणून तुम्ही सर्वांशी समानतेनं वागण्याची शपथ घेता. तुम्ही देशाचे पंतप्रधान असता. पक्षाचे पंतप्रधान नसता. तुम्ही जाऊन एखाद्या पक्षाचा जर प्रचार करणार असाल तर तो अपराध आहे लोकशाहीमध्ये,’ असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.