राज्यातील शेतकऱ्यांच्या बेमुदत संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्यांबाबत सरकारसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले. शेतकरी आणि सरकारमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी असल्याचेदेखील अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. ‘शेतकऱ्यांच्या वतीने सरकारसोबत चर्चा करण्याची माझी तयारी आहे. हा विषय संवादाच्या माध्यमातून सोडवला जाऊ शकतो,’ असे अण्णा हजारे यांनी म्हटले.

शेतकऱ्यांच्या संपाविषयी एका प्रसिद्धीपत्रातून अण्णा हजारे यांनी त्यांची भूमिका मांडली. ‘सहन करण्याची क्षमता संपल्यामुळे शेतकरी नाईलाजास्तव रस्त्यावर उतरला आहे. सरकार दाद देत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर कायदा हातात घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करुन शेतकऱ्यांच्या मागण्यांची योग्य ती दखल घ्यावी,’ असे अण्णा हजारे यांनी प्रसिद्धीपत्रात म्हटले आहे. ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माझी दोन वेळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री चर्चेला तयार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ चर्चेसाठी तयार असल्यास, मी पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करायला तयार आहे,’ असेदेखील अण्णा हजारे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मध्यस्थी केल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा मिळेल. कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव या दोन प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी संपावर आहेत. शेतकऱ्यांच्या बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस आहे. या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी सरकारने मुदत मागितली आहे. मात्र शेतकऱ्यांनी सरकारला कोणतीही मुदत देण्यास नकार दिला आहे. शेतकऱ्यांच्या संपामुळे राज्यातील बहुतांश भागातील कृषी मालाचे खरेदी-विक्रीचे व्यवहार, वाहतूक ठप्प झाली आहे.

संपाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दुधाची वाहतूक करणारे ट्रक अडवल्याच्या घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या संपाचा मोठा फटका मुंबईसह पुणे, नाशिक यासारख्या शहरांना बसला आहे. शेतकऱ्यांचा संप कायम राहिल्यास राज्यभरातील बाजारपेठांमध्ये अन्नधान्य, भाजीपाला आणि दुधाची तीव्र प्रमाणात टंचाई निर्माण होणार आहे. यासोबतच बाजारपेठेतील भाजीपाला आणि फळांचे दर वाढल्याने त्याचा मोठा फटका शहरी भागातील लोकांना बसणार आहे.