मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आज चाकण येथील झालेल्या आंदोलनाच्या दरम्यान एसटी बस आणि खासगी गाड्यांची तोडफोड आणि जाळण्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे पुणे विभागाकडून शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारामधून बाहेरगावी जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या दुपारपासून रद्द करण्यात आल्या होत्या.
आतापर्यंत 10 बसेसचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळत असून, नेमका आकडा मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. एसटी विभागाचे 40 लाखांचे नुकसान झाले आहे अशी माहिती एसटी पुणे विभागाचे नियंत्रण कक्षाच्या यामिनी जोशी यांनी दिली.
मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण लागू करण्यात यावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पुणे ग्रामीणच्या चाकण भागात हिंसक आंदोलन सुरु होते. यावेळी आंदोलकांनी अनेक एसटी गाड्यांसह पीएमपीच्या बसेसची जाळपोळ करीत पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरला. आंदोलकांना पसरवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पिंपरी-चिंचवड भागात मराठा समाजाचे आंदोलन सुरु होते. दरम्यान, आंदोलकांनी आळंदी, खेड, चाकण, हिंजवडी येथे बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे हिंजवडी वगळता सर्वत्र कडकडीत बंद असून सर्व व्यवहार ठप्प झाले होते. दरम्यान, चाकण येथे काही आंदोलकांनी हिंसक होत २५ ते ३० बसेसची जाळपोळ केली.