करोना मुकाबल्यासाठी उपाययोजना करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याची टीका करत भाजपाने ‘माझे अंगण, माझे रणांगण’ या आंदोलनाला सुरुवात केली आहे. राज्यभरातील भाजपाचे महत्वाचे नेते करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात ठाकरे सरकार कमी पडत असल्याचा आरोप करत रस्त्यावर आले आहेत. देशातील २० टक्के करोना रुग्ण महाराष्ट्रात असून राज्य सरकारची निष्क्रियता सातत्याने पहायला मिळत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकार आणि त्यांचे मंत्री आभासी जगात जगत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेला राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटलांचं अंगण नेमकं कोणतं?? देवेंद्र फडणवीस स्वतः आपल्या अंगणात नागपूरला गेले का?? त्यांच्या अंगणात काँग्रेस कार्यकर्ते मदत करत आहेत, असा टोला थोरात यांनी फडणवीस यांना लगावला आहे.

आणखी वाचा- भाजपसोबत जाऊन महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना?; जनतेने विचार करावा : जयंत पाटील

कायम राज्यपालांच्या अंगणात जाण्यापेक्षा राज्यातील भाजपा नेत्यांनी स्वतःच्या अंगणात जाऊन जनतेला मदत करावी असा सल्लाही थोरात यांनी दिला आहे. दरम्यान, “केंद्र सरकारने २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. पण राज्य सरकारच्या वतीने एका दमडीचंही पॅकेज दिलेलं नाही. राज्य सरकार अंग चोरुन काम करत असल्याची परिस्थिती आहे. इतर राज्यांनी मदत जाहीर केली आहे, पण आपलं सरकार एक नवा पैसा खर्च करण्यास तयार नाही,” असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.