अन्य घटनेत दोन महिलांचाही मृत्यू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ : करोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेली टाळेबंदी आता नागरिकांच्या जीववार बेतत आहे. यवतमाळ जिल्ह्यात रोजगार नसल्याने दोन तरुणांनी आत्महत्या करून जीवन संपवले. तर अन्य दोन घटनेत दोन विवाहित तरुणींचा मृत्यू झाला. त्यामुळे करोना संसर्ग आणि टाळेबंदी किती जणांचा जीव घेईल, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टाळेबंदीमुळे रोजगार नसल्याने बाभूळगाव तालुक्यातील गणोरी आणि घारफळ येथे दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. गणोरी येथील गणेश श्रीराम जांभुरे (३५) या तरुणाने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. वडिलोपार्जित अडीच एकर शेतीत कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने तो मजुरी करायचा. गेल्या एक महिन्यापासून रोजगार नसल्याने घरातील पाच जणांसह कुटुंब कसे चालवायचे, या विवंचनेत तो होता. याच विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. अन्य घटनेत घारफळ येथील प्रशांत मंगल ठाकरे (२४) या तरुणानेही टाळेबंदीमुळे रोजगार नसल्याने आलेल्या वैफल्यातून बुधवारी गळफास घेतला. तो पुण्यात एका कंपनीत होता. टाळेबंदीमुळे काम बंद झाल्याने तो गावी परत आला होता. भविष्यात काम मिळणार नाही, या चिंतेने त्याला ग्रासले होते. दोन्ही घटनांचा तपास बाभूळगाव पोलीस करीत आहेत.

टाळेबंदी असताना जिल्ह्यातील बँका आणि एटीएमसमोर जनधन खात्यातील ५०० रुपये काढण्यासाठी मोठमोठय़ा रांगा लागल्या आहेत. अशाच रांगेत पैसे काढण्यासाठी उभी असलेली एक महिला भोवळ येऊन पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना केळापूर तालुक्यातील कोरेगाव (रामपूर) येथे शुक्रवारी घडली. भारती अरुण कुंटलवार (३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. प्रकृती ठिक नसतानाही ती कारेगाव (रामपूर) येथील मिनी एटीएमवर पैसे काढण्यासाठी रांगेत उभी होती. त्यात भोवळ येऊन पडली. उपस्थित नागरिकांनी तिला तत्काळ रूंझा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत महिला रेल्वे कर्मचारी कर्तव्यावरून दुचाकीने परत येताना अपघात होऊन दगावली. रिया रुद्रांश पात्रे (२६) रा. नागपूर या चांदूर रेल्वे (जि. अमरावती) येथे पॉईंटमन म्हणून कार्यरत होत्या. टाळेबंदीमुळे रेल्वे बंद असल्याने त्या यवतमाळ येथे राहून चांदूर रेल्वे येथे डय़ुटीवर जाणे-येणे करायच्या. शनिवारी दुचाकी (क्र. एमएच २९ एकएक्स ४६०८)ने चांदूर रेल्वे येथून डय़ुटीवरून यवतमाळला परत येत असताना बाभूळगाव तालुक्यातील महमंदपूर नजीक त्यांची दुचाकी स्लीप झाली. त्यात डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.