पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण पुणे हादरलं आहे. तर, राज्यभरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही मुलाखत रखडल्याने नोकरी मिळत नसल्यामुळे स्वप्निलने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तर, आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमधून या व्यवस्थेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. परीक्षा उत्तीर्ण होऊनही दोन वर्षांपासून स्वप्निल मुलाखतीच्या प्रतिक्षेत होता. पण मुलाखतच झाली नसल्यामुळे तो प्रचंड तणावाखाली होता. आता त्यानं आत्महत्या केल्याने राज्यभरातील इतर स्पर्धा परीक्षा देणारी मुलं देखील सरकारला थेट जाब विचारू लागली आहेत. यावरून आता विरोधी पक्ष भाजपाकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या घटनेवरून ठाकरे सरकावर जोरदार टीका केली आहे.

Swapnil Lonkar Suicide : “मुख्यमंत्री साहेब, तुमचा २८ वर्षांचा मुलगा मंत्री होतो; पण आमच्या नियुक्त्यांचं काय?”

“ MPSC ची परीक्षा पास होऊन देखील नोकरी नाही मिळाली म्हणून स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली..सुन्न करणार्‍या या घटना सांगतात योग्य निर्णय योग्य वेळी नाही घेतला तर निष्पाप लोकांचे जीवन उध्वस्त होते.. जबाबदारी कोणाची व्यवस्थेची ना?” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

तर,“ स्वप्नील लोणकर या MPSC उत्तीर्ण झालेल्या आमच्या भावाचा ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळं जीव गेला त्याबद्दल सर्वज्ञानी संजय राऊत यांच्याकडनं अपेक्षित होते की आपल्या नेहमीच्या पहाटेच्या आरवण्यात काहीतरी दोन शब्द बोलतील नाहीतर नेहमीप्रमाणे केंद्राला तरी दोष देतील. पण हे पुन्हा सिद्ध झाले की ते ‘प्रस्थापितांचे पोपट’आहेत.. स्वप्नील लोणकर या आमच्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली.” असं ट्विट करत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

स्वप्निलने MPSC ला का म्हटलं मायाजाल?; वाचा आत्महत्येपूर्वी लिहिलेलं मन हेलावून टाकणारं पत्र

परीक्षा उत्तीर्ण होऊनही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला, या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव आणखीच वाढत गेला. अखेर त्याची हिंमत खचली आणि त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. आयुष्य संपवण्यापूर्वी स्वप्निलने एक पत्र लिहिलं, ज्यात त्याने आपल्या वेदना व्यक्त करत, सुरूवातीलाच MPSC मायाजाल आहे, यात पडू नका असं आवाहनही केलं आहे.