राज्यातील मंदिर खुली करण्याची मागणी दिवसेंदिवस जोर पकडताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ‘घंटानाद’ करण्याऱ्या भाजपानं मंदिर खुली करण्यासाठी आज पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंदिर खुली करण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं असून, काही सवाल उपस्थित केले आहेत.

लॉकडाउन शिथिल केला जात असतानाच राज्यात मंदिर खुली करण्याची मागणी जोर धरायला लागली होती. मंदिर खुली करण्यासंदर्भात भाजपा, वंचित बहुजन आघाडीसह इतर संघटनांनीही आंदोलनं केली. मात्र, करोना वाढीचा धोका असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी तूर्तास मंदिर खुली होणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर पुन्हा एकदा भाजपा आक्रमक झाल्याचं आज दिसून आलं.

आणखी वाचा- साईमंदिर सुरु करा ही मागणी करत शिर्डीतही भाजपाचं आंदोलन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही मंदिर खुली करण्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. यात राज्यपालांनी एकीकडे सरकार बार, रेस्टॉरंट खुले करत आहेत. तर देवीदेवतांना मात्र अजूनही लॉकडाउनमध्येच ठेवलं आहे. मागील तीन महिन्याच्या काळात अनेक शिष्टमंडळांनी या संदर्भात माझी भेट घेतली आहे. तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहात. तुम्ही हे सार्वजनिकरित्या मान्यही करता. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तुम्ही आयोध्येलाही गेला होता. तुम्ही पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुख्मिणीचीही पूजा केली. अनेक राज्यात मंदिर खुली करण्यात आली असून, महाराष्ट्रातही करोना मार्गदर्शक सूचनाची अमलबजावणी करून मंदिर खुली करण्यात यावी, असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आहे.