कोरोनाबाधितांच्या संख्येने सोळा दिवसांत उस्मानाबाद जिल्ह्यात अर्धशतक पूर्ण आहे. मंगळवारी प्रलंबित असलेल्या 11 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 7 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर दोघांचे अहवाल संदिग्ध असून दोघे निगेटिव्ह आहेत. मुंबई, पुणे रिटर्न आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आतापर्यंतचे अहवाल पाहता समोर आले असून, उस्मानाबादकरांनी आता अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.

मंगळवारी प्रलंबित ठेवण्यात आलेल्या 11 जणांचे अहवाल बुधवारी सायंकाळी प्राप्त झाले. यात एकूण सात जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे, तर दोघांची तपासणी असंदिग्ध असल्याचे म्हटले आहे. तर दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. लोहारा तालुक्यातील जेवळी येथील दोन जणांचा बाधितांच्या यादीत समावेश आहे. ते देखील मुंबईहुन गावी परतले आहेत. यापूर्वी आढळून आलेला रुग्णांशी त्यांचा संपर्क आला होता. तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथील तिघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे तिघेही मुंबईहून गावी आले आहेत. धुत्ता येथे आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आणखी एकाला करोनाची बाधा झाली आहे. तर, उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथे एक कोरोनाबाधित आढळून आला आहे.

जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाबाधितांची संख्या 43 वर पोहचली होती. प्रलंबित असलेल्या 11 पैकी 7 जणांचे अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले आहेत. सोमवारी पाठविण्यात आलेल्या 77 पैकी 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते तर 11 जणांचे अहवाल प्रलंबित ठेवण्यात आले होते. त्यात वाढ होऊन कोरोनाबाधितांची जिल्ह्याची संख्या आता 50 वर गेली असून 8 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर 42 जणांवर उपचार सुरु आहेत.

Story img Loader