तेंदूपाने तोडण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेलेल्या एका इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अभिमन नारायण झिलपे (५०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी पहाटे ही घटना घडली.
आज पहाटे कोंढाळा येथील काही नागरिकांसह अभिमन झिलपे हे गावालगतच्या जंगलात तेंदूपाने तोडण्यासाठी गेले होते. सकाळी अकरा वाजतापर्यंत बहुतांश नागरिक गावात परत आले. परंतु अभिमन झिलपे हे आले नाही. त्यामुळे नागरिकांना शंका आली. त्यांनी वडसा वनविभागाला कळविताच उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर, सहायक वनसंरक्षक भास्कर कांबळे, उपविभागीय वनाधिकारी सुनील सोनटक्के, वडसाचे वनपरिक्षेत्राधिकारी राहुल शिंदे, आरमोरीचे वनपरिक्षेत्राधिकारी सचिन डोंगरवार, वनपरिक्षेत्राधिकारी (वन्यजीव) रंजन इनवते हे आपल्या सहकाऱ्यांसह जंगलात गेले. तेथे शोध मोहीम राबविली असता दुपारी दीड वाजताच्या सुमारास जंगलात अभिमन झिलपेचा मृतदेह आढळून आला.
जंगलात वाघाचे वास्तव्य असल्याने कुणीही त्या परिसरात एकट्याने जाऊ नये, असे वनविभागाचे कर्मचारी गस्त घालून सांगत आहेत. तरीही नागरिक तेंदूपाने तोडण्यासाठी जात असल्याने वाघाने हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. मागील पंधरवड्यात आरमोरीनजीकच्या जंगलात वाघाने एका इसमास ठार केले होते. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. यामुळे नागरिक धास्तावले आहेत.