नागपूर शहरातील वोक्हार्ट आणि सेव्हन स्टार या रुग्णालयांनी करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांकडून अधिक शुल्क आकारल्याप्रकरणी आयुक्त तुकाराम मुढें यांनी रुग्णालयांना नोटीस पाठवली आहे. रुग्णांकडून घेण्यात आलेले अतिरिक्त पैसे परत करण्याचे आदेश आयुक्तांनी रुग्णालय प्रशासनाला दिले. ही नोटीस पाठवल्याने रुग्णालयाने रुग्णांना १० लाख रुपये परत केले आहेत. यासंदर्भातील वृत्त मुंढे यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करण्यात आलं आहे.
मुंढे यांनी नोटीस पाठवल्यानंतर वोक्हार्ट रुग्णालयाने नऊ लाख ५० हजार तर सेवन स्टार रुग्णालयाने एक लाख रुपये रुग्णांना परत केले आहेत. कोणत्याही खासगी रुग्णालयाने अशाप्रकारे करोनाबाधित रुग्णांकडून घेतलेली रक्कम परत करण्याचे हे राज्यातील पहिलेच प्रकरण आहे. रुग्णांकडून एवढी रक्कम का आकारण्यात आली यासंदर्भातील जाब मुंढे यांनी दोन्ही रुग्णालयांना विचारला होता. वोक्हार्टने कोणतही उत्तर न दिल्याने मुंढेंनी रुग्णांना पैसे परत करण्याचे आदेश दिले. तसेच पैसे परत न केल्यास साथ प्रबंध कायदा, आपत्कालीन परिस्थिती नियंत्रण कायदा आणि आवश्यक सेवा कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असा इशाराच मुंढेंनी रुग्णालयांना दिला. यानंतर दोन्ही रुग्णालयांनी रुग्णांना पैसे परत केले आहेत.
नक्की वाचा >> “प्रिस्किप्शन वाचता येईल अशा अक्षरामध्ये लिहा”; उच्च न्यायालयाचे डॉक्टरांना आदेश
याच बातमीचे कात्रण ट्विट करत मुंढे यांनी, “देशाचा कायदा आणि समानता हे समाजाच्या योग्य वाटचालीसाठी खूप महत्वाचे असतात. केवळ काद्यामुळे एखादा समाज ओळखला जात नाही तर तो कायदा कशा पद्धतीने अंमलात आणला जातो यावरुन समाजाची ओळख पटते. नागरिक, संस्था आणि सर्वांनीच कायद्याचे पालन केलं पाहिजे. या माध्यमातून सहकार्यामुळे एकमेकांनाच फायदा होईल,” असं म्हटलं आहे.
Rule of law & equality before law are cardinal principles of better governed societies. Society is known just not by its laws but more by its implementation. Citizens, institutions, establishments need to follow laws to make better society in the benefit of one and all. pic.twitter.com/ZFdPcpqqJn
— Tukaram Mundhe (@Tukaram_IndIAS) August 14, 2020
मुंढेंच्या या ट्विटवर रिप्लाय देत अनेकांनी त्यांच्या या निर्णयाचे कौतुक केलं आहे.