करोना संसर्गातून बरं झालेल्या तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरुन नागपूरला थँक्यू आणि बाय बाय म्हटलं. त्यांची फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल होते आहे. नागपूरकरांनी सात महिन्यांच्या कालखंडात जी साथ दिली आहे त्याबद्दल त्यांनी नागपूरकरांना धन्यवाद दिले आहेत जिथे कुठे असेन तिथे आपले प्रेम कायम असेल असंही त्यांनी म्हटलं आहे.
तुकाराम मुंढे यांनी काय म्हटलंय?
Goodbye NMC, Thank you Nagpur!
नुकतंच कोविड विषाणूच्या संक्रमणातून मी मुक्त झालो. अनेकांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि आलेल्या प्रत्येकाला भेटण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या प्रति असलेल्या प्रत्येकाच्या भावनांचा मी आदर करतो. आपण दिलेल्या प्रेमाच्या ऋणात मी आयुष्यभर राहीन अशी ग्वाही यानिमित्ताने देतो.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कर्तव्य बजावलेला सात महिन्यांचा काळ माझ्यासाठी खूप काही शिकविणारा ठरला. कोविड महामारीच्या निमित्ताने मनपा आयुक्त म्हणून जे अधिकार प्राप्त झाले, त्या अधिकारांचा उपयोग उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी कठोर निर्णय घेतले. त्यावर टीका झाली. मात्र, प्रत्येक निर्णय हा जनतेच्या भल्यासाठी घेतला याचे समाधान नक्कीच आहे. या काळातील अनुभव आयुष्यभरासाठी शिदोरी म्हणून कामात येईल, यात शंका नाही.
जे-जे चांगले शिकायला मिळाले, ते शिकलो. काही कटू अनुभव असतीलही; मात्र त्यातूनही बोध घेतला. नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी उद्या मुंबईला रवाना होतोय. जेथे कुठे असेल, आपले प्रेम कायम सोबत असेल. या शहरासाठी काही चांगले करण्याचा प्रयत्न केला, याचा अभिमान असेल. नागपूर महानगरपालिकेतील कटू-गोड आठवणींसह मनपाला Good bye. आपण सर्वांनी जी साथ दिली त्याबद्दल Thank you…!
अलविदा…!
तुकाराम मुंढे यांची ही पोस्ट आणि त्यासोबतचा व्हिडीओ हा चांगलाच व्हायरल होतो आहे.
कडक शिस्तीचे अधिकारी अशी ख्याती असलेले व अनेक कारणांनी चर्चेत असणारे तुकाराम मुंढे यांची बदली राज्य सरकारनेच रद्द केली आहे. फक्त १५ दिवसांमध्येच तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरुन तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी ही बदली करण्यात आली होती. २६ ऑगस्टला हा आदेश निघाला होता. मात्र अवघ्या १५ दिवसात ही बदली रद्द झाली आहे. नागपूर महापालिका आयुक्तपदावरुन मुंढे यांची बदली झाल्यानंतर या पदाचा कार्यभार राधकृष्णन बी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान आता तुकाराम मुंढे यांना अद्याप दुसरा कोणताही पदभार देण्यात आलेला आलेला नाही. असं असलं तरीही थँक्यू नागपूर आणि बाय बाय नागपूर असं म्हणणारी त्यांची फेसबुक पोस्ट व्हायरल होते आहे.