करोना बाधितांची वाढती संख्या आणि लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या काही लोकांमध्ये नैराश्य आले असून याचा त्यांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसून येत आहे. कारण, नाशिकमध्ये दोन भिन्न घटनांमध्ये दोन तरुणांनी गळफास घेऊन आपले जीवनच संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आजाराच्या धास्तीने एकाने तर लॉकडाउनमुळे घरी जाता येत नसल्याने दुसऱ्या एका तरुणाने गळफास घेतल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी नाशिक शहर परिसरातील चेहडी शिवारात करोनाच्या धास्तीने तसेच औषधोपचार घेण्यास भीती वाटत असल्याने ३२ वर्षाच्या तरुणाने गळफास घेतला होता. याच घटनेची पुनरावृत्ती सिन्नर तालुक्यात मंगळवारी घडली. शहापूर (दातली) येथील एका तरुणाला चार दिवसांपासून घश्याचा त्रास जाणवत होता. त्यासंबंधी त्याच्यावर उपचारही सुरू होते. दरम्यान, मंगळवारी त्याच्या आजीचा दशक्रिया विधी होता. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पहाटे देवनदी तीरावर हा विधी उरकण्यात आला. मात्र, यावेळी संबंधित तरुण तिथे आला नसल्याचे लक्षात आल्यावर त्याला पाहण्यासाठी त्याचा भाऊ घराकडे गेला. त्यावेळी अंथरूणात या तरुणाने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यामध्ये करोना आजार होऊ नये म्हणून सर्वांनी गरम पाणी प्या. मी खूप प्रयत्न केला, काळजी घेतली पण यश आले नाही. आता थेट देवाला साकडं घालायला चाललो आहे, असा मजकूर लिहिला होता. तरुणाच्या भावाने याची माहिती अन्य नातेवाईकांना दिली. त्यानंतर सर्वांनी मिळून त्याचा शोध सुरू केला. तेव्हा खोपडी येतील एका शेतात आंब्याच्या झाडाला त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. याची सिन्नर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी या तरुणाच्या वडिलांचे तर गेल्या आठवड्यात आजीचे निधन झाले. या तरुणाच्या मागे आई, पत्नी, लहान भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, लॉकडाउनमुळे अनेकांना त्यांच्या मूळ गावी जाता येत नसल्यानं त्यांच्यामध्ये नैराश्य आलं आहे. रावेर येथील दोघे सख्खे भाऊ नाशिकच्या मविप्र शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात शिकत होते. यासाठी सातपूर येथील गुलमोहर कॉलनी परिसरात त्यांनी भाड्याने घर घेतले होते. लॉकडाउनच्या काळातही दोघे घरी जाण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यासाठी प्रशासकीय परवानगी मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. घरी जाता येत नसल्याच्या नैराश्यातून या दोघांपैकी एका एकवीस वर्षीय तरुणानं मंगळवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेतला. हा प्रकार समजताच त्याच्या भावाने इतर नागरिकांच्या मदतीने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, वैद्याकीय अधिकाऱ्यांनी त्याला उपचारांपूर्वीच मृत घोषित केलं. या संदर्भात सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.