महाराष्ट्राचे पाच उमेदवार पहिल्या पन्नासांत, तर नव्वद उमेदवारांची निवड; मुंबई ‘आयआयटी’चा कनिष्क कटारिया देशात पहिला
मुंबई : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या शनिवारच्या गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात राज्यातील विद्यार्थ्यांच्या यशाची गुढी उंच असल्याचे पाहायला मिळाले.
यंदा राज्यातील ८५ ते ९० उमेदवारांची या परीक्षेतून निवड झाली. तर पहिल्या पन्नास उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. आयआयटी मुंबईतून पदवी घेतलेला, जयपूर येथील कनिष्क कटारिया याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुंबई आयआयटी येथून २०१४ मध्ये कनिष्कने अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतली होती. अक्षत जैन याने द्वितीय आणि जुनैद अहमदने तृतीय क्रमांक पटकावला. यंदा उपलब्ध जागांची संख्या कमी असल्यामुळे राज्यातील उमेदवारांनी ८ ते ९ टक्क्यांचे प्रमाण गाठले आहे. वयाने कमी असलेले, पहिल्यांदाच परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे वरची श्रेणी मिळवणाऱ्या मुलींच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. आयोगाकडून प्रशासकीय सेवा (आयएएस), विदेश सेवा (आयएफएस), पोलीस सेवा (आयपीएस), गट अ आणि गट ब या पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. त्यातील लेखी परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, तर मुलाखत फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात आली. देशभरातील उमेदवारांतून ७५९ उमेदवारांची या पदांसाठी निवड करण्यात आली. त्यातील आयएएससाठी १८०, आयएफएससाठी ३०, आयपीएससाठी १५०, गट अ साठी ३८४, गट ब साठी ६८ उमेदवार यशस्वी ठरले.
राज्यातील यशवंत
पूजा प्रियदर्शनी (११), तृप्ती दोडमिसे (१६), वैभव गौंदवेने (२५), मनीष आव्हाळे (३३), हेमंत पाटील (३९), स्नेहल धायगुडे (१०८), नचिकेत शेळके (१६७), मनोज महाजन (१२५) डॉ. श्रेनिक लोढा (१३३), दिग्विजय पाटील (१३४), अमित काळे (२१२), योगेश पाटील (२३१), नवजीवन पवार (३१६), ऋतुजा बनकर (३२५), स्नेहा गिते (३३१), अभयसिंह देशमुख (३६१), प्रतीक खामतकर (३७७), शुभम ठाकरे (४१२), परमानंद दराडे (६१५), मच्छिंद्र गाळवे (६४०)
ठळक बाबी.. मुळच्या बुलढाणा येथील परंतु मध्यप्रदेशात वास्तव्य असलेल्या सृष्टी देशमुख मुलींमध्ये पहिली तर देशात पाचवी आली आहे. पूजा प्रियदर्शनी-मुळे हिने देशात अकरावा क्रमांक पटकावला आहे तर पुण्याच्या तृप्ती धोडमिसेने देशांत सोळावे स्थान पटकावले आहे. यंदा राज्यातील पाच ते सहा उमेदवार पहिल्या शंभर क्रमांकामध्ये आहेत. तर परीक्षेतून ८५ ते ९० उमेदवारांची निवड झाली आहे. यंदाही अभियंते असलेल्या उमेदवारांचे वर्चस्व परीक्षेमध्ये दिसून आले.