चांद्रयान २ मोहीम यशस्वी न झाल्याने इस्रोचे प्रमुख के. सिवन यांना भावना अनावर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांनी मिठी मारत धीर दिल्याचा प्रसंग सर्व देशवासियांनी पाहिला. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी या प्रसंगावर आपल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांचाही समावेश असून त्यांनी मिठी मारून रडणे एका वैज्ञानिक संस्थेच्या प्रमुखास नक्कीच शोभत नाही असं मत व्यक्त केलं आहे. इस्रो प्रमुख भावविवश झाले ही बातमी भितीदायक असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

विश्वंभर चौधरी यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत आपलं मत मांडलं आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “चांद्रयान मोहीम यशस्वी झाली नाही ही बातमी दुःखदायक आहे पण इस्रो प्रमुख भावविवश झाले ही बातमी भितीदायक आहे. कुठल्याही गोष्टीचं श्रेय घेणे वगैरे मिठी संप्रदायातील राजकारण्यांना शोभते, मिठी मारून रडणे एका वैज्ञानिक संस्थेच्या प्रमुखास नक्कीच शोभत नाही. सीवन भावविवश झाले असले तरी आपल्या या भावूकतेचाही प्रचारासाठी उपयोग केला जाऊ शकतो हे भान तरी त्यांनी ठेवायला हवे होते”.

विज्ञानात अपयश नसतेच, असतो तो केवळ प्रयोग – मोदी
सर्व काही संपलेलं नाही! न्यूयॉर्क टाइम्सकडून इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतुक

“नासाच्याही अनेक मोहिमा अयशस्वी झालेल्या आहेत पण नासाप्रमुख अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या गळ्यात पडून रडल्याच्या चित्रफिती पाहण्यात नाहीत,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे. “फार मोठ्या शास्त्रज्ञांनी इस्रो सांभाळली आहे, अनेक अपयशं पचवली आहेत. मोहीम फत्ते झाली की टाळ्या वाजवून माफक आनंद साजरा करणे आणि मोहीम अयशस्वी झाली तर कारणमीमांसा करून दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाला लागणे हीच इस्रो संस्कृती आहे. तीच रहावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

“इस्रो ही वैज्ञानिक संस्था आहे, राजकीय पक्ष नाही. चांद्रयान हे एक जटिल वैज्ञानिक यंत्र आहे, इव्हीएम मशीन नाही. स्वाभाविकच आहे की इस्रोचे यश अनिश्चित असणार,” असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी इस्त्रोला शुभेच्छा देत इस्रोने इस्रोच रहावे. ह्रदयानं नाही, मेंदूंनंच विचार करावा. इस्रोचं तेच बलस्थान आहे,” असं सांगितलं. “भविष्यात ही मोहीम इस्रो नक्की यशस्वी करणार यात मला कोणतीही शंका नाही कारण इस्रोची स्थापनाच मजबूत पायावर झालेली आहे,” असंही शेवटी त्यांनी लिहिलं आहे.