– प्रशांत देशमुख
वर्धा : बाहेरगावहून मुळ गावी परतणाऱ्यांच्या वाटा गावकऱ्यांनीच रोखण्याची उदाहरणे मोठ्या प्रमाणात राज्यभरातून पूढे आली. या पाश्र्वाभूमीवर, ही तर गावचीच लेकरं, अशा भूमिकेतून सर्वांचे स्वागत करीत त्यांची चोख बडदास्त ठेवत विलगीकरण साध्य करणाऱ्या एका आदर्श ग्रामपंचायतीचे उदाहरण पूढे आले आहे.
हिंगणघाटलगत नांदगाव (बोरगाव) ग्रामपंचायतीने करोनाशी लढा देतांना दाखविलेले व्यवस्थापन मोठ्या शहरासाठीसुध्दा नवलपरीचे ठरावे. शहरालगतच्या कंपन्यांमध्ये काम करणारे बहुसंख्य असल्याने हे तसे कामगार व शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाते. याच गावातील काही पूण्या‑मुंबईत व अन्य शहरातील निवासी होते. टाळेबंदी व विषाणूचा प्रसार यामूळे हे सर्व नांदगावला आले. सगळ्यांनाच प्रशासनाने गृहविलगीकरणाची मुभा दिली होती. मात्र यापैकी काही घराबाहेर पडत असल्याचे दिसून आल्यावर सरपंच निलीमा हेमंत पोगले व इतर सदस्यांनी खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला.
गावातीलच जिल्हा परिषदेची व खासगी शाळा ताब्यात घेतली. प्रशासनाला विनंती करून बाहेरून येणाऱ्या सर्वांनाच गृहविलगीकरणात न ठेवता संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचे परवानगी घेतली. झाडांच्या गर्द सावलीत असलेल्या शाळा इमारतीतील खोल्यांमध्ये कुटूंबासह स्थानांतरण करण्यात आले. मुली महिला सर्वच या शाळेत चौदा दिवसाच्या मुक्कामास राहले. घरी ठेवल्यास कुटूंबाचेच विलगीकरण होत असल्याने काहींनी मुलीला एकट्यानेच राहण्यास पाठविले. हा विश्वाास ग्रामपंचायत पूढाऱ्यांच्या वागणूकीमूळे होता.
८ मे पासून ३८ स्त्री पुरूषांची व्यवस्था शाळेत करण्यात आली. विलगीकरण न जुमानणारे व कुटूंबालाच विलगीकरणात ठेवण्याऐवजी संस्थात्मक ठेवण्याचा निर्णय काहींनी घेतला. अनेक गावात बाहेरच्यांसाठी वाटा बंद झाल्या. पण आम्ही ही आमच्याच गावची लेकरं म्हणून त्यांना सन्मानाने आश्रय दिला. गावाचीही सुरक्षा राहली, असे मत पोगले व्यक्त करतात. प्रत्येक कुटूंबासाठी स्वतंत्र खोली. एकटी असल्यास तिलाही स्वतंत्र खोली सर्व व्यवस्थेसह देण्यात आली. रोज थंडगार पाण्याची कॅन प्रत्येक खोलीत उपलब्ध असे. सर्वाना कुलर देण्याची बाब आरोग्य खात्याने फेटाळली. मात्र एका दीड वर्षाच्या बाळासह राहणाऱ्या महिलेला कुलर देण्यात आला. रोज शौच्छालय व परिसराची स्वच्छता राखल्या जात आहे. जेवणावर तर सर्वच खूश. विलगीकरण आटोपलेला शुभम जयपाल कांबळे म्हणतो की रोज सकाळ संध्याकाळ मिळालेले जेवण आयुष्यात विसरणार नाही.
अंडाकरी, पाणगे, भरीत व वेगवेगळ्या भाज्यांचे रूचकर जेवण उपलब्ध झाल्याने घरची आठवण झाली नसल्याचे मुंबईकर असलेला शुभम सांगतो. हा तर गावातल्या गावात पर्यटनस्थळी गेल्याचा अनुभव ठरावा, असे अन्य एका व्यक्तीने नमूद केले. हा सर्व खर्च गावकऱ्यांच्या देणगीतून, लगतच्या कंपन्यांनी केलेल्या मदतीतून तसेच ग्रामपंचायतच्या काही निधीतून करण्यात आला. एवढेच नव्हे तर रोजगार गेल्याने गावातील ७० कामगार कुटूंबांना धान्य व किराणा मालाची मदतही ग्रामपंचायतने केली. करोनाला तर रोखलेच पण गावात एकही व्यक्ती उपाशी झोपू नये म्हणून ग्रामपंचायत यशस्वी ठरल्याचे मत सरपंच पोगले व्यक्त करतात.