राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आज शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला न भेटल्याने त्यांच्यावर चहू बाजूंनी टीका होत आहे. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणी संदर्भात आज मुंबईच्या आझाद मैदानावर शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. या आंदोलनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी एकटवले होते. आझाद मैदानात सभा झाल्यानंतर शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून निवेदन देणार होते.
मात्र राज्यपाल राजभवानात उपस्थित नव्हते, त्यामुळे ही भेट होऊ शकली नाही. त्यावरुन राज्यपालांवर चौफेर टीका होत आहे. दरम्यान या संपूर्ण वादावर आता राजभवनातून स्पष्टीकरण समोर आलं आहे. राज्यपालांच्या दौऱ्यांची शेतकरी मोर्चाला पूर्वकल्पना दिल्याचे राजभवनाने म्हटले आहे.
राज भवनातून आलेल्या स्पष्टीकरणात काय म्हटलं आहे?
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. ते सोमवारी गोवा विधान सभेच्या प्रथम सत्राला संबोधित करणार असल्याने राज्यपाल महोदय त्या दिवशी शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नाहीत, असे राज भवनाकडून सांगण्यात आले आहे.
संयुक्त शेतकरी मोर्चाचे धनजंय शिंदे यांना 22 जानेवारी रोजी दुरध्वनीव्दारे तसेच निमंत्रक श्री प्रकाश रेडडी यांना 24 जानेवारीला पत्राद्वारे राज्यपालांच्या अनुपलब्धतेविषयी कळविण्यात आले होते. शिंदे यांनी व्हॉटसॲप संदेशाव्दारे निरोप मिळयाल्याचे मान्य केले होते. त्यामुळे राज्यपालांनी शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊन भेट दिली नाही हे वृत्त चुकीचे असल्याचे राजभवनाकडून सांगण्यात आले आहे.
शरद पवारांनी राज्यपालांवर काय टीका केली?
“तुम्ही राज्यपालांना निवेदन द्यायला निघाला आहात. पण महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपाल गोव्याला निघून गेलेत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही.” अशी जोरादार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली आहे.