शिवसेना भवन तोडण्याची भाषा केल्यामुळे संतापलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना संजय राऊत यांनी जर त्यांच्या खांद्यावरुन भाजपा बंदूक चालवत असेल तर मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहे. कार्यकर्ते-नेते-पदाधिकाऱ्यांनी उत्तरं देऊन झाल्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही थपडीची भाषा केली आहे. शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जाण्याची वेळ येईल, असा इशारा देत यायचंय तर या मग, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यावर निलेश राणे यांनी यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत संजय राऊतांना शिवसेना भवनात नेऊन फटके देऊ असा इशारा दिला आहे. “हे काय ऐकतोय मी की संज्या धमकी द्यायला लागलाय, संज्या तू फटाके खाणारच आहेस पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेहून फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देतोय आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत,” असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

…तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांनी दिला जाहीर इशारा

निलेश राणे यांनी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्यावरही ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे. काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत असं म्हणत निलेश राणेंनी सदा सरवणकर यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याबाबत केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. आमचे शाखाप्रमुख त्यावर बोलतील, अशी बोचरी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली होती. शिवसेनेतून प्रचंड संताप व्यक्त होऊ लागल्यावर प्रसाद लाड यांनी सारवासारव केली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आदर असून त्यांच्या सेनाभवन फोडण्याचा प्रश्नच नाही. माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ निघाला, असा खुलासा लाड यांनी केला होता.