मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० डिसेंबर रोजी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या ऑनसाईट कार्यालयात जाऊन सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली. मात्र आता याच प्रकल्पाचा फायदा आणि त्यावरील खर्चासंदर्भात मनसेचे कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. सहा किलोमीटर अंतर कमी करण्यासाठी ६६०० कोटी खर्च करायची काय गरज होती?, असा प्रश्न राजू पाटील यांनी विचारला आहे.
#टोल_चा_झोल हा हॅशटॅग वापरुन राजू पाटील यांनी खोपोली ते कुसगाव मार्गाच्या बांधकामावर आक्षेप घेतला आहे. “खोपोली एक्झिट ते सिंहगड संस्था हे १९ कि.मी. चे अंतर फक्त ६ कि.मी. ने कमी होऊन १३.३ कि.मी. इतके होईल. त्यासाठी ६६०० कोटी रुपये खर्च करायची काय गरज होती?,” असा प्रश्न पाटील यांनी ट्विटमधून विचारला आहे. पुढे त्यांनी, “मुद्दाम टोल दर वाढवून जनतेचा खिसा कापायचा व स्वत:चे खिसे भरायचे उद्योग चालू आहेत का?”, असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हॅण्डललाही टॅग केलं आहे. तसेच राजू पाटील यांनी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनाही या ट्विटमध्ये टॅग केलं आहे.
खोपोली एक्झिट ते सिंहगड संस्था हे १९ कि.मी. चे अंतर फक्त ६ कि.मी. ने कमी होऊन १३.३ कि.मी. इतके होईल. त्यासाठी ₹ ६६०० कोटी खर्च करायची काय गरज होती ? मुद्दामहून टोल दर वाढवून जनतेचा खिसा कापायचा व स्वत:चे खिसे भरायचे उद्योग चालू आहेत का ? #टोल_चा_झोल @OfficeofUT @mieknathshinde pic.twitter.com/vMCDsdq7VV
— Raju Patil (@rajupatilmanase) December 14, 2020
काय आहे प्रकल्प
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली ते कुसगाव दरम्यान नवीन मार्गिकेच्या (मिसिंग लिंक) प्रकल्पांतर्गत खालापूर पथकरनाका ते लोणावळ्यापर्यंत (सिंहगड संस्था) मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची क्षमता वाढ करणे प्रस्तावित आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी १९.८० कि.मी. असून या प्रकल्पांतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील ५.८६ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पहाणीदरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी लोणावळ्याजवळील कुसगाव ते खोपोली दरम्यान उभारण्यात येत असलेल्या भूमिगत बोगदा आणि मिसिंग लिंकच्या मार्गिकेच्या कामाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.
काय फायदा होणार?
खोपोली ते कुसगाव बाह्यवळण दरम्यान १३.३ किलोमीटर अंतराचा भूमिगत बोगदा आणि मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत बोगद्याचे दोन किलोमीटर अंतरापर्यंतचे काम झाले आहे. या प्रकल्पात १०.५५ किलोमीटर लांबीचा बोगदा असणार आहे. त्यापैकी अडीच किलोमीटर अंतर बोगदा हा लोणावळा धरणाच्या जलाशयाच्या ११४ ते १७५ मीटर खालून जाणार आहे. तसेच लोणावळा खंडाळा डोंगर, पठारावरील दऱ्यांतून ९०० मीटर लांबीचा एक व्हायडक्ट पूल व दुसरा ६५० मीटर अंतराचा केबल स्टॅन्ड पूल असणार आहे. हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा (बोरघाट) घाटात होणारी रोजची वाहतूक कोंडी आणि अपघातांना आळा बसेल. या प्रकल्पामुळे अवजड वाहनांसाठी खंडाळा घाटमाथा परिसरात लागणारा प्रवासाचा वेळ २० ते २५ मिनिटांनी कमी होईल आणि घाटातील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे सांगण्यात येत आहे.