ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांच्या निधनाने शब्दांसोबतच सुरांवर प्रभूत्व असलेला आणि मराठी भावगीतांचे विश्व समृध्द करणारा एक अस्सल कलावंत हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. यशवंत देव यांचे मंगळवारी पहाटेच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.

‘अनेक भावगीतांसह देव यांनी नाटकांना दिलेले संगीतही कायम स्मरणात राहील. एक अष्टपैलू संगीतकार म्हणून यश मिळवण्यासोबतच त्यांनी लिहिलेली अनेक गीतेही लोकांच्या ओठावर सहज येतात. नव्या पिढीच्या आवडींशी नाळ जोडतानाच संगीताचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांची अविरत धडपड होती. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला आहे,’ असं मुख्यमंत्री म्हणाले.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून देव यांना श्रद्धांजली वाहिली.

यशवंत देव यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.