राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच अद्याप पूर्णपणे सुटलेला नसताना, दुसरीकडे भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना जोरादार उधाण आलं आहे. ‘हारणार असं वाटणारी मॅचही जिंकली जाऊ शकते’ असं गडकरी यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी म्हटले आहे.

राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. कधीकधी तुम्हाला वाटतं की तुम्ही मॅच हारत आहात, मात्र निकाल पूर्णपणे वेगळा लागतो. मी नेमकाच दिल्लीहून आलो आहे, मला महाराष्ट्रातील राजकारणातील सविस्तर माहिती नाही, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

सध्या राज्यात महाशिवआघाडीकडून सत्तास्थापनेसाठी जोरादार हालचाली सुरू आहेत. आज राज्यात सरकार स्थापन करण्याच्या दिशेनं शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसनं एक पाऊल टाकलं आहे. समान कार्यक्रम ठरवण्यासाठी तिन्ही पक्षांची आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीत समान कार्यक्रमाचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला असून, फक्त तिन्ही पक्षश्रेष्ठींची मोहोर उमटायची औपचारिकता राहिली आहे.

तर दुसरीकडे भाजपाने देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्व १०५ आमदारांसह सहकारी पक्षांचे आमदार व समर्थन दिलेल्या आमदारांची बैठक घेतली आहे. याच दरम्यान केंद्रीय मंत्री गडकरी यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केल्याने नव्या राजकीय चर्चांनी जोर धरला आहे.