गृहनिर्माण क्षेत्रातील ‘एचडीआयएल’ समूहाशी निगडित कर्जाच्या घोटाळ्यामुळे आर्थिक निर्बंध आलेल्या ‘पीएमसी बँके’चे ठेवीदार अडचणीत आले आहेत. रिझर्व्ह बँकेने सुरूवातीला पैसे काढण्यावर कठोर बंधने आणली होती. हा मुद्दा महिनाभरापासून गाजत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएमसी बँकेचा मुद्दा निवडणुकीनंतर केंद्राकडे मांडण्यात येईल, असं सांगितलं.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या संकल्प पत्र अर्थात जाहिरनामा मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा हे उपस्थित होते. जाहिरनामा प्रकाशनाच्या कार्यक्रमात आर्थिक अडचणीत आलेल्या पीएमसी बँकेसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “हा मुद्दा आम्ही निवडणुकीनंतर केंद्र सरकारकडे घेऊन जाणार आहोत. ठेवीदारांचे पैसे परत मिळाण्यासंदर्भात केंद्राकडे विनंती करू. मी स्वतः या प्रकरणात पाठपुरावा करणार आहे,” असं फडणवीस म्हणाले.

रिझर्व्ह बँकेने २४ सप्टेंबर रोजी पीएमसी बँकेवर निर्बंध लादताना १ हजार रूपये काढण्याची मर्यादा घातली होती. त्यानंतर १,००० रुपये काढण्याची मर्यादा दोनच दिवसांत १०,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली.  त्यानंतर आठवडाभरात ती २५,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली. सध्या ही मर्यादा ४० हजार इतकी करण्यात आली आहे. मात्र, अचानक ही बंधने आल्याने ठेवीदार हवालदिल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठेवीदार याकडे केंद्र आणि राज्य सरकारच लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान, सोमवारी बँकेत पैसे अडकून पडले असल्याच्या चिंतेने एका ठेवीदाराचा मृत्यू झाला आहे. ५१ वर्षीय संजय गुलाटी यांचा ह्रदय बंद पडल्याने मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे, पीएमसी बँकेविरोधात आंदोलन करुन घरी परतल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. संजय गुलाटी ओशिवरामध्ये राहत होते. ओशिवरामधील पीएमसी बँकेच्या शाखेत त्यांचं खातं असून, जवळपास ९० लाख रुपये बँकेत अडकले आहेत.