‘छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि आईवडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..’ अशा शब्दांत ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर रंगलेला सत्तेच्या सापशिडीचा खेळ संपला. राज्यात अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव यांना शुभेच्छा दिल्या. मात्र या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उद्धव यांना शुभेच्छा देणं टाळलं. यावरुनच आता राजकीय वर्तुळामध्ये अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करायचं टाळलं की ते विसरले अशी चर्चा रंगली आहे.

शिवसेनेची स्थापना आणि प्रसार ज्या शिवाजी पार्कवरून झाला त्याच ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या शेजारी उभारलेल्या भव्य व्यासपीठावर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी झाला. या शपथविधीमध्ये शिवसेनेच्या तीन, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन अशा एकूण सात मंत्र्यांनी शपथ घेतली. या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवरुन उद्धव यांना शुभेच्छा दिल्या. “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांना माझ्याकडून शुभेच्छा. महाराष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी ते मेहनतीने काम करतील हा मला विश्वास आहे,” असं ट्विट मोदींने केलं. याचप्रमाणे नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांनी ट्विटवरुन उद्धव यांना शुभेच्छा दिल्या. मात्र अमित शाह यांनी उद्धव यांना शुभेच्छा दिल्या नाहीत.

विधानसभा निवडणुकींमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचे युतीच्या बाजूने बहुमत दिले. मात्र अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याच्या शिवसेनेच्या मागणीला भाजपाने नकार दिला आणि राज्यात राजकीय पेच निर्माण झाला. तीन आठवडे सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाची बाजू मांडताना अमित शाह यांच्यामुळे शिवसेना आणि मोदींमध्ये दरी निर्माण झाल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला. तसेच शाह यांनी मातोश्रीला भेट दिली तेव्हा बाळासाहेबांच्या खोलीमध्ये काय चर्चा झाली हे उघड करावे असंही राऊत यांनी म्हटलं होतं. याला उत्तर देताना तर शाह यांनी बंद दाराआड झालेल्या चर्चा उघड करण्याची आमच्या पक्षाची शिस्त नाही असं सांगितले होते. तसेच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यावर काहीच चर्चा झाली नव्हती असंही शाह यांनी स्पष्ट केलं. अखेर हा तिढा न सुटल्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. मात्र महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शपथ घेतल्यानंतरही शाह यांनी शुभेच्छा दिलेल्या नाहीत. त्यामुळेच सत्तेवरुन झालेल्या शाब्दिक चकमकीमुळेच त्यांनी शिवसेनेच्या पहिल्या मुख्यमंत्र्याला शुभेच्छा देणे टाळले की खरोखरच ते विसरले अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.

उद्धव यांना शुभेच्छा देताना कोण काय म्हणाले

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन. राज्यातील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याबरोबरच ते विकासाच्या रस्त्यावरून महाराष्ट्राला पुढं घेऊन जातील अशी अपेक्षा मला आहे.
– राजनाथ सिंह (केंद्रीय संरक्षण मंत्री)

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
– नितीन गडकरी (केंद्रीय मंत्री)

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
– देवेंद्र फडणवीस (विरोधीपक्ष नेते)

Story img Loader