निवडणूक निकालानंतर भाजपा आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून व समसमान वाटपांवरून वाद उद्भवला आणि परिणामी जनतेदने बहुमत दिलेल्या महायुतीमधील हे दोन्ही पक्ष विभक्त झाले. भाजपाने सत्ता स्थापन करू शकत नसल्याचे राज्यपालांना सांगितल्यानंतर दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर मिळून महाशिवआघाडीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काँग्रेस-राष्ट्रवादीकडूनही शिवसेनेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मात्र, अद्याप राज्यात सत्ता स्थापनेचा पेच काही सुटलेला नाही, महाशिवआघाडीची केवळ चर्चा आणि बैठकाच सुरू असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता चित्रपटसृष्टीतील कलाकारमंडळींकडून पुन्हा निवडणुकीचा सूर आळवला जात असल्याचे दिसत आहे. ‘# पुन्हानिवडणूक?’ असं अनेक कलाकारांकडून पोस्ट केल्या जात आहे.

हे पाहता काँग्रेसकडून भाजपाच्या आय़टी सेलवर जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजपाच्या आयटी सेलचा या कलाकारांशी काय संबंध आहे? याची पोलिसांकडून चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली आहे.

”भाजपाच्या आयटी सेलचा या कलाकारांशी काय संबंध आहे? याची पोलिसांकडून चौकशी झाली पाहिजे. कोब्रापोस्टने या अगोदर बॉलीवुडच्या कलाकारांचे स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्यात भाजपातर्फे राजकीय ट्विट करण्यासाठी पैसे ऑफर केले जाते हे स्पष्ट झाले आहे” असे सावंत यांनी ट्विट केले आहे.

नामवंत कलाकारांकडून ‘# पुन्हानिवडणूक?’ अशी पोस्ट केली जात असल्याने त्यांच्या चाहतावर्गातूनही संमिश्र प्रतिक्रिया उमटतांना दिसत आहेत. कलाकारांनी राजकारणात पडू नये असे देखील अनेकांचे मत आहे. तर,दुसरीकडे  शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संयुक्त सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांची गुरुवारी सहमती झालेली आहे.