राफेल विमानाची पूजा करताना दोन लिंब ठेवल्यावरून मोदी सरकारवर टीका होऊ लागली आहे. सोशल मीडियात यावर मीम्स व्हायरल होत असून, एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही सरकारवर तोफ डागली आहे. “नवीन राफेल विमानाच्या चाकाखाली दोन लिंब ठेवली. ते लिंब भारताचे नाही तर पॅरिसचे होते. राफेल घेताहेत तर, लिंबू ठेवता आणि तुम्ही समान नागरी कायदा कसा आणणार,” असे सांगत मी नवीन गाडी घेतली तर लिंबू चाकाखाली ठेवत नाही. तर त्याचं सरबत करून पाजतो,” असं सांगत ओवेसी यांनी निशाणा साधला आहे.

परभणी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अली खान यांच्या प्रचारार्थ खासदार असदुद्दीन ओवेसी यांची सभा झाली. यावेळी बोलताना ओवेसी यांनी राफेलच्या चाकाखाली ठेवलेले लिंबू आणि समान नागरी कायद्यावरून सरकार हल्लाबोल केला. “तुम्ही लिंबू ठेवता कुणी हिरव्या मिरची लावत. कुणी लाल मिरची लावत. कुणी पान लावतं ही भारताची विविधता आहे. देश सध्या राफेल विमान खरेदी करत आहे. यासाठी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग फ्रान्सला गेले आहेत. मात्र, त्याठिकाणी विमानाच्या चाकाखाली दोन लिंबू ठेवले आहेत. ते लिंबू भारताचे नव्हे तर फ्रान्सचे आहेत. ही हसण्यासारखी गोष्ट नाही. ते बर झालं. एकीकडे नवीन विमानाची पूजा करताना चाकाखाली लिंबू ठेवले. तर दुसरीकडे तुम्हाला समान नागरी कायदा आणायचा आहे. एकीकडे लिंबू ठेवायचे आणि दुसरीकडे समान नागरी कायदा आणायचा, हे कसे होईल ? तुम्ही काही ठेवा, लिंबू ठेवा, टरबूज ठेवा, खरबूज ठेवा, अंगूर ठेवा, तुमची मर्जी आहे,”असा टोला लगावत “मी नवीन गाडी घेतली की तिच्या चाकाखाली लिंबू ठेवत नाही. तर त्याच सरबत करून लोकांना पाजतो,”असं ओवेसी म्हणाले.

देशातील हिंदू संयुक्त परिवारांना तथा करोडपती उद्योजकांना करांमध्ये सवलत मिळते, मग मुस्लिमानांही सवलत द्या ना, तुम्हीच म्हणता आमच्या इथे खूप मुले असतात. मग आम्हाला सवलत नको का? समान नागरी कायद्यात मुळात मूलभूत सुविधा पुरवणे अपेक्षित आहे. शुद्ध पाणी देणे यात येते; परंतु सत्ताधाऱ्यांना पाणी देणे शक्य होत नाही आणि हे कायद्याची भाषा बोलतात, असेही ओवेसी म्हणाले.