महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले असताना अनेक पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अकोल्यामधील मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये घेतलेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. “फडणवीसांच्या सभेमध्ये शेतकरी कर्जमाफीबद्दल विचारतात तेव्हा ते प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी ‘भारत माता की जय’च्या घोषणा देतात”, असा आरोप कडू यांनी आपल्या भाषणात केला आहे.

मूर्तिजापूरमधील सभेत बच्चू कडू यांनी भाजपा सरकार आणि फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “मुख्यमंत्र्यांच्या एका सभेमध्ये शेतकऱ्याने उभं राहून कर्जमाफी न झाल्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तो प्रश्न ऐकून न घेता भारत माता की जय… भारत माता की जय अशा घोषणा दिल्या,” असा आरोप कडू यांनी आपल्या भाषणात केला. हे उदाहरण देत त्यांनी भारत माता तुमची मात्र मलिदा या लोकांचा असा टोला कडू यांनी फडणवीस यांना लगावला.

“कलम ३७० हटवून सरकाने चांगला निर्णय घेतला पण शेतकऱ्यांचा आत्महत्या होत आहेत त्याचं काय? यासंदर्भात भाजपाने काय केलं?,” असा सवाल कडू यांनी उपस्थित केला. राज्यातील निवडणुका या राज्यामधील, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन व्हायला हव्यात. मात्र आज असं होताना दिसत नाही. निवडणुकीमध्ये कलम ३७० चा मुद्दा भाजपाकडून पुढे केला जात आहे अशी खंत कडू यांनी बोलून दाखवली.