महाविकास आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. तर दुसरीकजे उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. अशातच भाजपा नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. हे दरोडेखोर आता आता उघड दरोडे टाकणार कारण महाराष्ट्रात वर्गणी टॅक्स सुरू झाला आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

“एका बाजुला उद्धवचं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर झालं आणि त्याचं वेळेला मालवण शिवसेना नगराध्यक्ष आणि अधिकारी एक ठेकेदाराकडून पैसे घेताना स्टिंग ऑपरेशन मध्ये अडकले. हे दरोडेखोर आता उघड दरोडे टाकणार कारण महाराष्ट्रात वर्गणी टॅक्स सुरू झाला आहे,” अशा आशयाचं ट्विट करत निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यापूर्वीही अनेकदा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याने भाजपाने स्थापन केलेल्या सरकारकडे बहुमत नसल्याचे कारण देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजक्यापालांकडे राजीनामा सादर केला. “अजित पवारांचा राजीनामा आल्याने आमच्याकडेही बहुमत उरलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आमच्यासोबत आल्याने आम्ही सत्ता स्थापन केली होती. आता अजित पवारच आमच्यासोबत नाहीत त्यामुळे आमच्याकडे बहुमत नाही. आम्ही आमदार फोडणार नाही,” असं स्पष्ट करत फडणवीस यांनी राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. फडणवीस यांनी ही घोषणा केल्यानंतर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी एक ट्विट केलं होतं. मागील अनेक दिवसांपासून राज्यातील परिस्थितसंदर्भात वक्तव्य करताना ट्विटवरुन शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या निलेश यांनी फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा ट्विट केलं होतं. “काहींना वाटतं खेळ संपला पण राजकारणात खेळ कधीच संपत नाही. एक संपला की दुसरा सुरू होतो. जो पर्यंत खेळ आणि खेळाडू आहेत तो पर्यंत सामना होणारच,” असं सूचक वक्तव्य निलेश यांनी केलं होतं.