विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आमचा आकडा हा भाजपापेक्षा दहाने जास्त असणार आहे. बहुमत आमच्याकडे आहे. सत्ता नसेल तर  भाजपाचे नेते वेडे होतील. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद किंवा सत्ता मिळवण्यासाठी या देशातले राज्यकर्ते कोणत्या थराला जाता आहेत. हे चित्र घृणास्पद आहे. असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत केले आहे. यावेळी त्यांनी अजितदादांना भाजपाकडून अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद ऑफर करण्यात आले असल्याचे देखील मी ऐकले आहे, असे देखील सांगितले.

राज्यातील सत्तासंघर्षाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, २० प्रमुख मंत्रीपदं आणि अजित पवार यांना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं असल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे. मात्र यात कितपत तथ्य आहे हे मला माहिती नाही. माध्यमांद्वारेच मला ही माहिती मिळाली आहे. यावरून हे दिसून येत आहे की कशाप्रकारचे राजकारण राज्यात सुरू आहे. महाविकास आघाडीतील नेते आज राज्यपालंची भेट घेणार आहेत. जे आमदार अजित पवारांबरोबर गेले होते त्यापैकी जवळपास सर्वजण परत आले आहेत.  जी माहिती भाजपाबद्दल आमदार देत आहेत. त्यात सांगितलं जात आहे की आम्हाला दबाव आणला जात आहे, ऑफर दिली जात आहे. हे देशाच्या लोकशाहीला शोभनीय नाही. आमदारांना अक्षरशा डांबून ठेवण्यात आलं होतं, एवढच नाहीतर त्या ठिकाणी हरियाणातील पोलिस देखील तैनात करण्यात आले होते, हे योग्य नाही.

महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद किंवा सत्ता मिळवण्यासाठी या देशातले राज्यकर्ते कोणत्या थराला जाता आहेत, हे चित्र घृणास्पद आहे. प्रश्न इतकाच आहे, जर तुमच्याकडे बहुमत होतं. ते बहुमत राज्यपालांना तुम्ही मध्यरात्री दाखवलं म्हणून तुम्ही शपथ घेतली. जर तुमच्याकडे बहुमत होतं तर मग  चंबळच्या डाकूंसारखी ही गुंडागर्दी , दरोडेखोरी करण्याची गरज काय? एकतर राज्यपालांची फसवणूक केली. राष्ट्रपतींची फसवणूक केली आणि महाराष्ट्रातील जनतेची देखील फसवणूक केली. मात्र, आम्ही यांना पुरून उरणार आहोत. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आमचा आकडा हा त्यांच्यापेक्षा दहाने जास्त असणार आहे, बहुमत आमच्याकडे आहे. सत्ता नसेल तर भाजपा नेते  वेडे होतील, महाराष्ट्रात आमचे सरकार आल्यानंतर आम्ही आमच्या आरोग्य नेत्यांना सांगू की काही भागांमध्ये वेड्यांची रूग्णालयं मोठ्याप्रमाणावर निर्माण करा. कारण त्यांना हा पराभवाचा धक्का पचणार नाही, त्यांची मानसिकता बिघडू शकते.

ऑपरेश कमळमध्ये केवळ चारजण आहेत. त्यात सीबीआय, ईडी, आयटी आणि पोलीस यांचा समावेश आहे. या चौघांकडून ऑपरेशन कमळ सुरू आहे, मात्र आमच्याकडे त्याचा काहीही परिणाम होणार नाही. जर तुमच्याकडे बहुमत होते तर ऑपरेशन कमळाची आवश्यकता तुम्हाला का पडली? असा सवालही संजय राऊत भाजपाला उद्देशुन केला.