राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार असा दावा करीत भाजपाने शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १३ मंत्रीपदांची ऑफर दिली आहे. तर मुख्यमंत्रिपदासह गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही खाती कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडेच राहतील असेही भाजपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे.

भाजपाकडून आज विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील हे आता स्पष्ट झाले आहे. यानंतर शिवसेनेचा कल लक्षात घेत राज्यपालांकडे ते सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाचे नेते या नात्याने सत्ता स्थापनेचा दावा करु शकतात.

शिवसेना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यावर अडून बसली आहे. मात्र, युतीपूर्वी अशा प्रकारचे कुठलेही आश्वासन शिवसेनेला देण्यात आले नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी नुकतेच म्हटले होते. त्यावरुन शिवसेना चांगलीच संतापली असून काल भाजपासोबतची होणारी बैठक त्यांनी रद्द केली.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युल्यावर ठाम असून ही मागणी मान्य न झाल्यास आपल्याकडे सत्तास्थापनेसाठी इतरही पर्याय असल्याचे शिवसेनेने बोलून दाखवले आहे. तर शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास त्यांच्यासोबत सत्ता स्थापण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे या सत्तेच्या दाव्यावर शिवसेनेची काय भुमिका असेल यावर पुढील चित्र स्पष्ट होईल.