भाजपाच्या तीन बैठका पूर्ण झाल्या. काल निवडून आलेल्या आमदारांची बैठक झाली. आज दोन बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीचं विश्लेषण आम्ही केलं. भाजपाकडे १०५ जागा तर १४ अपक्ष साथीला आले आहेत. भाजपाकडे ११९ जागा आहेत. त्यामुळे भाजपाच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. १६४ जागांपैकी आम्ही १०५ जागा जिंकलो आहोत. राज्यात १ कोटी ४२ लाख अशी सर्वाधिक मतं भाजपाला मिळाली आहेत असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रात निकालाच्या दिवसापासून सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मागितलं. त्यानंतर दोन्ही पक्षांचं त्यावर एकमत झालं नाही. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी असं काही ठरलंच नव्हतं हे सांगितलं. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला खोटं ठरवलं जात असल्याने चर्चेची दारं बंद केल्याचं सांगितलं. त्यानंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपाला निमंत्रण दिलं. भाजपाने शिवसेना सोबत येत नाही म्हणून असमर्थता दर्शवली. त्यानंतर शिवसेनेला निमंत्रण देण्यात आलं, मात्र शिवसेनेलाही सत्ता स्थापनेचा दावा सिद्ध करता आला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसलाही निमंत्रण दिलं गेलं मात्र त्यांनी मुदतवाढ मागितली आणि त्याच संध्याकाळी महाराष्ट्रात राज्यपालांनी केलेल्या शिफारसीनंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
आता शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत चर्चा सुरु केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांची भेट घेतली. चर्चा योग्य दिशेने सुरु झाली असून लवकरच हा पेच सुटेल असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. तर भाजपाने या सगळ्या घडामोडींदरम्यान वेट अँड वॉच हीच भूमिका घेतली. आता चंद्रकांत पाटील यांनी कालपासून झालेल्या बैठकांची आणि त्यानंतर आज झालेल्या दोन बैठकांची माहिती दिली. आगामी काळात भाजपाच्या नेतृत्त्वातच सरकार स्थापन होईल हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.