विधानसभेच्या प्रचारादरम्यान अनेक मुद्द्यांवरुन गाजलेला कोथरुड मतदारसंघ पुन्हा एकदा एका नव्या घटनेमुळे चर्चेत आला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडमधील उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी विरोधी उमेदवार मनसेचे किशोर शिंदे यांना मतदान केंद्रांवरच ऑफर दिल्याची चर्चा आहे. मात्र, किशोर शिंदेंचा एकूणच अविर्भाव पाहता पाटील आपल्या खेळीत यशस्वी होऊ शकले नाहीत.

चंद्रकांत पाटील यांनी सकाळी कोथरुड मतदारसंघामधील मयुर कॉलनीतील जोग शाळेतल्या मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी तिथे मनसेचे उमेदवार किशोर शिंदे हे देखील उपस्थित होते. यावेळी दोन्ही उमेदवारांनी एकमेकांची हसतखेळत मैत्रीपूर्ण भेट घेतली, यावेळी पाटील यांनी शिेंदे यांना भाजपात येण्याची ऑफर दिली. मात्र, याला शिंदे यांनी नम्रपणे नकार दिला. मात्र, या दोन्ही विरोधी उमेदवारांच्या भेटीची दिवसभर शहरभर चर्चा सुरु होती.

मनसेचे उमेदवार असलेले किशोर शिंदे हे स्थानिक उमेदवार असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांचाही पाठींबा मिळाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचे वजन वाढले आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील हे स्थानिक नसल्याने त्यांच्या उमेदवारीला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे निकालाच्या दिवशी कोथरुडचे काय चित्र राहते याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.