अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्रकार परिषद घेत जाहीर केलं. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर बोचरी टीका करत शिवसेना सोनियांची करत असलेली लाचारी लखलाभ असल्याचं म्हटलं आहे. “महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते सोनिया गांधींची शपथ घेत होते. सत्तेसाठी किती मोठी लाचारी स्विकारणार. ही लाचारी त्यांना लखलाभ,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“जे लोक मातोश्रीवरुन बाहेर पडत नव्हते, ते अनेकांच्या पायऱ्या झिजवू लागले आहेत,” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. “जनतेने भाजपला जनादेश दिला, कारण आम्ही ७० टक्के जागा जिंकलो, तर शिवसेना केवळ ४० टक्के जागांवर विजयी झाली होती. शिवसेनेला नंबर गेम लक्षात आला आणि बार्गेनिंग पॉवर वाढल्याचं समजल्याने जे कधीच ठरलं नव्हतं, त्याबाबत सेनेने धमकी दिली, तरीही भाजपने सात्विक भूमिका घेतली. परंतु शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा करु लागली,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

आम्ही भूमिका घेतली होती की घोडेबाजार करणार नाही, फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी अख्खं घोड्याचा तबेला उभा केला असा टोला यावेळी फडणवीस यांनी लगावला.  “अजित पवारांचा राजीनामा आल्याने आमच्याकडेही बहुमत उरलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आमच्यासोबत आल्याने आम्ही सत्ता स्थापन केली होती. आता अजित पवारच आमच्यासोबत नाहीत त्यामुळे आमच्याकडे बहुमत नाही. आम्ही आमदार फोडणार नाही. ही पत्रकार परिषद झाल्यावर मी राज्यपालांना भेटून राजीनामा देणार आहे,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केलं.

“दोन चाकं असताना वेगाने धावता येतं. तीन चाकांची रिक्षाही धावते. मात्र तीन चाकं वेगवेगळ्या दिशेने धावू लागल्यानंतर काय होईल,” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी हे अस्थिर सरकार असेल असं म्हटलं.

“सुरुवातीला सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला बोलवण्यात आलं. मात्र आमच्याकडे बहुमताचा आकडा शिवसेना सोबत आल्याने नव्हता. मग शिवसेनेला बोलवण्यात आलं. त्यांनी स्वतःचं हसं करुन घेतलं. राष्ट्रवादीनेही स्पष्ट केलं की त्यांच्याकडे संख्याबळ नाही. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागली. भाजपाला दूर ठेवण्यासाठी तीन पक्ष झटू लागले आहेत. अजित पवार यांनी आम्हाला सत्तास्थापनेसाठी सहकार्य करायचं ठरवलं. त्यांच्याशी चर्चा केली, चर्चेच्या अनुरुप ते पत्र दिलं ज्या आधारे आम्ही सरकार स्थापन केलं. आज कोर्टाचा निर्णय आला तेव्हा बहुमत सिद्ध करायचं आहे त्यावेळी अजित पवार यांनी मला भेटून सांगितलं की मी राजीनामा देतो. मी या युतीत येऊ शकत नाही,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.