निवडणुकीचे निकाल लागून आता आठवड्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यातच सत्तावाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. अशातच भाजपा मोठा पक्ष ठरला असला तरी शिवसेना सत्तेचं समसमान वाटप आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या मागणीवर ठाम आहे. त्यातच शिवसेनेची हीच मुख्यमंत्रिपदाची मागणी तिढ्याचं मुख्य कारण आहे, अशी प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. “भाजपानं दिलेला शब्द पाळला पाहिजे. तसंच दीपावली असल्यामुळे या सत्तास्थापनेच्या चर्चेला विलंब झाला. तसंच सत्तास्थापनेच्या चर्चेसाठी भाजपा पुढाकार घेईल,” असंही ते म्हणाले.

“सत्ता स्थापनेचा तिढा कसा सोडवता येईल हे आम्ही चर्चेतून पाहू. याठिकाणी प्रश्न हा कोणत्याही पक्षाचा नाही तर जनतेचा आहे,” असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला. “अशा परिस्थितीचा कायमचं काँग्रेसनं फायदा घेतला आहे. तो त्यांचा मूळ स्वभाव आहे. यापूर्वी काँग्रेसनं अशा घटनांचा फायदा घेतला आहे. त्यांच्याकडून अन्य कोणत्या गोष्टीची अपेक्षाही नाही. चर्चा कोण करतंय यापेक्षा हा तिढा सुटणं महत्त्वाचं आहे. आम्हाला पाच वर्ष जनतेची सेवा करण्याची इच्छा असल्याचंही” ते म्हणाले.

आणखी वाचा- ‘सत्ता’बाजारात ‘मटका’ लागण्यासाठी भाजपाची ‘आकड्यां’ची जुळवाजुळव

“आम्ही सध्या एकत्र हा तिढा कसा सोडवता येईल याचा विचार करत आहोत. गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित नाही. राज्यात महायुतीचंच सरकार यावं अशी त्यांची इच्छा आहे. शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी हीच तिढ्याचं मुख्य कारण आहे. देवेंद्र फडणवीस हेदेखील स्वत:ला शिवसैनिकच समजतात. त्यामुळे मुख्यमंत्रिपद शिवसेनेलाच दिल्यासारखं” असल्याचं ते म्हणाले. “सध्या राज्यपातळीवर हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. आवश्यकता असल्यास राष्ट्रीय पातळीवर याची चर्चा केली जाईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच येत्या आठवड्यात नवं सरकार सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.