राज्यात निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. अशातच मुंबईत भाजपाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. या बैठकीला भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. राज्यात भाजपाशिवाय कोणाचंही सरकार येऊ शकत नाही. राज्यातील सद्यस्थिती ही तशीच असल्याचं मत त्यांनी मांडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरही टीका केली. दरम्यान, भाजपाच्या सहभागाचा फायदा मित्रपक्षांना झाला असून त्यामुळेच त्यांना अधिक जागांवर विजय मिळवता आला. भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेच्याही अनेक मतदारसंघात प्रचार केला. परंतु शिवसेनेचा कोणताही नेता भाजपा उमेदवाराच्या मतदारसंघात प्रचारासाठी आला नाही, असंही ते म्हणाले. भाजपा वगळता राज्यात कोणाचंही सरकार स्थापन होऊ शकत नाही, अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे. योग्यवेळी पक्षाकडून निर्णय घेण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, फडणवीस यांनी आमदारांना मुंबईत न थांबता जनतेची कामं करण्यासाठी जाण्याच्या सुचना केल्या. शेतकऱ्यांना मोठी मदत मिळेल हे नक्की आहे. परंतु सध्या त्यांना जाऊन मदत करावी, त्यांच्या दु:खात सहभागी व्हावं. सत्तेसाठी काम करणं हे आपलं लक्ष्य नसून जनेतेसाठी काम करणं हे आपलं लक्ष्य असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

तीन अंकी नाट्यावर लक्ष
राज्यात सत्तास्थापनेचं जे तीन अंकी नाटक सुरू आहे, त्यावर भाजपा लक्ष ठेवून आहे. राज्यभरात भाजपाच्या संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. भाजपाचे सर्व आमदार येणाऱ्या महिनाभराच्या काळात राज्यभरातील ९० हजार बूथवर भाजपा मजबूत करण्यासाठी संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम राबवणार आहेत. याचबरोबर ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील आमदार, विधानपरिषद सदस्यदेखील दोन ते तीन दिवस अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, मदत, पीक विमा कर्ज परतफेड या सर्व विषयांसाठी मदत कार्याची पाहणी आणि मदत करायला दौरा करणार आहेत, अशी माहिती गुरूवारी आशिष शेलार यांनी दिली होती.