विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असले तरी राज्यातील सत्तेच गणित जुळता जुळेना झालं आहे. १०५ आमदारांचं संख्याबळ असलेल्या भाजपा-शिवसेनेशिवाय पर्याय नाही. तर दुसरीकडं शिवसेना आपल्याकडं १७५ आमदारांचं संख्याबळ असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. भाजपा-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदामुळं चर्चा अडकल्याचं बोललं जात असलं तरी महत्त्वाच्या चार खात्यांपैकी दोन खाती शिवसेनेला हवी आहेत. त्यामुळंच दोन्ही पक्षातील चर्चा खुटंली असल्याची माहिती समोर येत आहे.

निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदासह सत्तेचं समसमान वाटप हवं, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यावर गेल्या दहा दिवसांपासून शिवसेना त्यावर ठाम असून, भाजपाकडून मुख्यमंत्री पद देणार नाही, अशी भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील चर्चा तूर्तास बंद आहे. त्यात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असून, भाजपाकडून घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला होता. त्यामुळं पडद्यामागं काय घडत आहे, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

सत्तेचं समसमान वाटप असं भाजपा-शिवसेनेमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या चर्चेत ठरलं होतं. पण, भाजपनं मुख्यमंत्रिपदासह गृह, महसूल, नगर विकास आणि वित्त या चार महत्वाच्या खात्यांवर चर्चा होणार नाही, असं सांगितलं होतं. या महत्त्वाच्या चार खात्यांपैकी दोन खाती शिवसेनेला हवी आहेत. त्यामुळंच चर्चा लांबली असल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीत गेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली असल्याचं भाजपाकडून बोललं जात असलं तरी, या चार खात्यांपैकी दोन खात्यांवर पाणी सोडायचं का? यावर या बैठकीत चर्चा होऊ शकते. सध्या गृह आणि नगरविकास ही दोन्ही खाती मुख्यमंत्र्यांकडे असल्यानं महसूल आणि वित्त ही खाती शिवसेनेला देऊन त्यांची नाराजी दूर करता येईल का याबाबत भाजपाच्या गोटात खलबतं सुरू आहेत. त्यावर भाजपा काय निर्णय घेते हे काही दिवसात पुढे येईल.