विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर शत्रू कोण नि मित्र कोण, हेच समजेनासे झाले आहे. काल ज्याला संपवण्याच्या आणाभाका घेतल्या, त्याच्याबरोबर आज गळ्यात गळे घालून नेतेमंडळी वावरत आहेत. तेव्हा अशी अद्भुत, अनोखी मैत्री होण्यापूर्वी ही मंडळी एकमेकांबद्दल काय बोलत होती, याचे हे पुनरावलोकन..
देवेंद्र फडणवीस
‘वाघाचे पंजे कुणाला दाखवता? आम्ही कुणाला घाबरत नाही. वाघाच्या जबडय़ात हात घालून दात मोजणारी आमची जात आहे. शिवसेनेला पराभव समोर दिसू लागल्याने आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले सुरू आहेत. शिवसेनेची संस्कृतीच दहशतवादी आहे. परंतु आम्हीही उत्तर देऊ शकतो, हे लक्षात ठेवा. केवळ कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आम्ही शांत आहोत.’
३० ऑक्टोबर २०१५
‘आम्हाला ‘ठग्ज ऑफ महाराष्ट्र’ म्हणणारे विरोधक हेच खरे तर ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ आहेत.’
१८ नोव्हेंबर २०१८
‘वाट पाहा, उद्धव ठाकरे यांना योग्य वेळी आणि योग्य उत्तर देणार आहे. शिवसेनेच्या विधानांना आम्ही फारसे महत्त्व देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. ती थुंकी कुठे जाते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.’
३१ डिसेंबर २०१८
उद्धव ठाकरे
‘लोकांना पाणी हवे आहे. पण पाणी कसले मागता, घरपोच दारू देतो, असे सांगणारे हे सरकार आहे. हे असले कसले सरकार? लोकांना जगायचे पडले आहे आणि यांना मुख्यमंत्री व्हायचे पडले आहे.’
४ ऑक्टोबर २०१८, अहमदनगर</strong>
‘उज्ज्वला गॅस नावाचा फुगा आहे. सबसिडी नावालाच आहे. प्रत्यक्षात जमा होते का, हा प्रश्न आहे. अशा सिलिंडरचे रिकामे फुगे काय कामाचे? ही योजना म्हणजे भूलभुलैया आहे. घराघरांमध्ये जाऊन योजनेचा फुगा फोडा.’
४ ऑक्टोबर २०१८, अहमदनगर
‘राम मंदिर कधी दिसेल? बाबरी पाडून घेतली, बाबरीच्या मुद्दय़ावरून गादी बळकावलीत आणि त्यावर कुंभकर्णासारखे लोळताय? सोहराबुद्दीन खटल्यातील सगळे निर्दोष मुक्त झाले, मात्र बाबरी पाडणाऱ्यांविरोधातील खटले अजून सुरू आहेत. ३० वर्षे होत आली; आता तुम्ही सांगता की, न्यायालयात हा मुद्दा आला आहे. हिंदू भोळा आहे, मात्र तो बावळट नाही. राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर संसदेत चर्चा होऊन जाऊ दे, एनडीएतील किती पक्ष विरोधात आहेत आणि किती समर्थनात आहेत, हे कळेल.’
२४ डिसेंबर २०१८, पंढरपूर
‘अण्णा हजारे यांनी आमरण उपोषण करून प्राणत्याग करण्यापेक्षा रस्त्यावर उतरून लढा द्यावा आणि देशाला जाग आणावी. सध्या देशातील जनतेला गुंगीचे औषध देण्यात आले असून जनतेला त्या गुंगीतून बाहेर काढणे गरजेचे आहे. अण्णांनी नव्या क्रांतीसाठी जयप्रकाश नारायण यांची भूमिका स्वीकारावी. गंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी हरिद्वारला प्रा. अग्रवाल उपोषणास बसले आणि त्यांच्या उपोषणाची दखल न घेता त्यांना मरू दिले. देशाची गंगा शुद्ध करण्यासाठी अण्णांनी उपोषण सोडावे आणि लढा उभारावा. जेथे शक्य आहे तेथे शिवसेना अण्णांना सोबत केल्याशिवाय राहणार नाही!’
२ एप्रिल २०१९, औसा
‘हिंदुत्वाची गरज म्हणून बाळासाहेबांनी भाजपसोबत युती केली. शिवसेनाप्रमुखांबरोबर तेव्हा सगळे टोलेजंग नेते होते. महाराष्ट्र ठामपणे शिवसेनाप्रमुखांच्या पाठीशी उभा राहिला तो हा काळ. पण युती न करता शिवसेना लढत राहिली असती, तर आजचे चित्र वेगळे असते. सेनेची ही चांगली २५ वर्षे दुर्दैवाने युतीमध्ये सडली.’
‘सामना’मधील मुलाखत,
२६ जुलै २०१६
‘यापुढे शिवसेना एकटय़ाच्या बळावर महाराष्ट्रात लढेल. आता कोणापुढेही युतीचे कटोरे घेऊन जाणार नाही. राज्यातील निवडणुकीत कुठेही युती करणार नाही. शिवसेना स्वबळावर राज्यातील आगामी सर्व निवडणुका लढणार.’
२६ जानेवारी २०१७
राधाकृष्ण विखे-पाटील
‘देवेंद्र सरकार म्हणजे नोबिता-डोरेमॉनचं कार्टून. हे सरकार फक्त जनतेला आश्वासन देते, मात्र त्याची अंमलबजावणी करत नाही. सरकारला सामान्य नागरिकांशी काही घेणंदेणं नसून त्यांच्या प्रश्नांची साधी जाणीवही यांना नाही.’
३ डिसेंबर २०१६, मुंबई
‘भाजप-शिवसेना सरकारने तीन वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे काम केले. सरकारची कामगिरीच शून्य असल्यामुळे त्यांना ‘मी लाभार्थी’च्या फसव्या जाहिराती कराव्या लागत आहेत. भाजप आणि उद्धव ठाकरे हे दोघेच सरकारचे खरे लाभार्थी आहेत!’
९ डिसेंबर २०१७
‘अंगणवाडी सेविकांवर लावलेल्या मेस्मा कायद्याला विरोध करत शिवसेना आमदारांनी विधानसभा सभागृह बंद पाडले. राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे मंत्री बसतात. सर्व निर्णयांचे प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे जातात आणि तिथे मान्य होतात. त्याच निर्णयांवर शिवसेनेचे आमदार सभागृहात गोंधळ घालतात. हे निर्णय घेतले गेले तेव्हा शिवसेनेचे मंत्री झोपले होते का? ही जनतेची साफ दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.
२१ मार्च २०१८
‘एकाचे अनेक अशा असंख्य उंदरांचा सुळसुळाट राज्यात गेली चार वर्षे सुरू आहे. या उंदरांवर ‘कडी नजर’ ठेवून, सरकारचे उंदरांच्या निर्मूलनातील अपयश वेळोवेळी दाखवून द्यायला सत्तेतीलच काही ‘बोकेही’ तयार झाले आहेत. वेळीच या उंदरांचे निर्मूलन केले नाही, तर या बोक्यांची संख्याही वाढत जाईल. या उंदरांनी गेली चार वर्षे जो उच्छाद मांडला आहे, तेच उंदीर राज्य पोखरतीलच, पण २०१९ ला सरकारची मते कुरतडल्याशिवाय आणि सिंहासन पोखरल्याशिवाय राहणार नाहीत.’
२७ मार्च २०१८
‘शेतकरी आत्महत्या, दुष्काळी स्थिती, कायदा व सुव्यवस्था, रोजगार, महागाई या प्रमुख मुद्दय़ांवर सरकार गेल्या चार वर्षांत अपयशी ठरले आहे. केवळ फसव्या घोषणा करून राज्यातील जनतेची दिशाभूल करणारे भाजप-शिवसेना म्हणजे ‘ठग्ज ऑफ महाराष्ट्र’ आहे. ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. आपल्या राज्यात चार वर्षे ठगबाजी सुरू आहे. राज्यातील जनतेने जसा ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ फ्लॉप केला, तसाच भाजप-शिवसेनेचा ‘ठग्ज ऑफ महाराष्ट्र’ फ्लॉप ठरणार आहे.
१८ नोव्हेंबर २०१८
उदयनराजे भोसले
‘कोण मोदी? साताऱ्यातील लोकांना फक्त पेढेवाला मोदी माहिती आहे.’
२६ नोव्हेंबर २०१६
दिवाकर रावते
‘आम्ही सर्व मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरत आहोत. आम्हाला फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश हवा आहे.’
८ फेब्रुवारी २०१७
नीतेश राणे
‘युतीमध्ये पहिली ठिणगी कशामुळे?
राम मंदिर? नाही!
शेतकरी? नाही!
नाणार रद्द? नाही!
बेस्ट कामगार? नाही!
मग कशासाठी?
मुख्यमंत्री आमचाच!!
याला म्हणतात सत्तेसाठी नंगा नाच!’
ट्विट, २१ फेब्रुवारी २०१९