विधानसभा निवडणुकीच्या निकालाला १९ दिवस उलटल्यानंतरही राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. राज्यपालांनी भाजपाला सत्तेस्थापनेसाठी शनिवारी आमंत्रण दिले होते. मात्र शिवसेना सोबत नसल्याने सत्ता स्थापनेचा दावा भाजपा करणार नाही असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर राज्यामध्ये दोन्ही काँग्रेसला बरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने हलचाली सुरु केल्या मात्र त्यातही त्यांना यश आलेले नाही. त्यानंतर आता राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. मात्र विरोधी मतप्रवाह असणारे पक्ष एकत्र येऊन स्थापन केलेली सत्ता किती काळ टीकेल असा सवाल उपस्थित केला जात आहे. असं असलं तरी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये जनतेने हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन केल्यास ते पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. या जनमत चाचणीमध्ये १५ हजारहून अधिक जणांनी आपले मत नोंदवले असून ६१ टक्के वाचकांनी शिवसेना- काँग्रेस – राष्ट्रवादीचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असं मत नोंदवलं आहे.

“विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने दिलेला जनादेश हा भाजपा-शिवसेना, रिपाई, रासपा, शिवसंग्राम अशा सर्व घटक पक्षांना होता. तथापि सरकार बनविण्यासाठी शिवसेना राजी नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान न करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेला सरकार बनवायचे असेल तर त्यासाठी आमच्या शुभेच्छा!,” असं पाटील यांनी स्पष्ट करत भाजपा सत्ता स्थापन करणार नाही असं सांगितलं. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं होतं. मात्र सोमवारी संध्याकाळी साडेसातपर्यंत त्यांना दोन्ही काँग्रेसच्या पाठिंब्याची पत्रे न मिळाल्याने सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी २४ तासांचा कालावधी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये तसेच मुंबईमध्ये बैठकींचे सत्र सुरु झाले. दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठकी, तर मुंबईमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बैठकी पार पडल्या आहेत. त्यामुळेच राज्यात दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेचे एक येऊन सरकार स्थापन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र हे कडबोळ्याचं सरकार अधिक काळ टीकणार नाही अशी टीका भाजपा समर्थकांकडून केली जात आहे तर दुसरीकडे हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल अशा विश्वास व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. फेसबुकवरील वाचकांनी हे सरकार टीकेल या पर्यायाच्या बाजूने मतदान केलं असून हे सरकार बहुमतात असल्याचं चित्र ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या जनमत चाचणीमध्ये दिसून आलं आहे.

फेसबुकवर विचारलेल्या ‘शिवसेना- काँग्रेस – राष्ट्रवादीनं सरकार स्थापन केल्यास ते किती काळ टीकेल असं वाटतं?,’ या प्रश्नाचं उत्तर देताना १५ हजार पैकी ६१ टक्के म्हणजेच ९ हजार ४०० हून अधिक जणांनी हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर ५ हजार ९०० हून अधिक जणांनी शिवसेना- काँग्रेस – राष्ट्रवादीचं सरकार ‘पाच वर्षाच्या आतच कोसळेल’ असं मत नोंदवलं आहे.

दरम्यान, आज राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचा दावा करण्यात अपयश आले तर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.